Carol Christine Video about Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हेकेखोर वृत्ती सर्वांनाच परिचित आहे. यामुळे सध्या रशिया, चीन, भारत यांना आंतरराष्ट्रीय दबावाला सामोरे जावे लागत आहे. पण ट्रम्प यांच्यामुळे आशिया खंडातील देशच नाही तर अमेरिकेतील नागरिकही त्रस्त झाले आहेत. अमेरिकन राज्यशास्त्राच्या तज्ज्ञ कॅरोल क्रिस्टीन फेअर यांनी पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश पत्रकार डॉ. मोईद पिरजादा यांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांच्याबद्दलचा संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी हिंदी भाषेतील एक शिवी दिली. या संवादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पत्रकार डॉ. मोईद पिरजादा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सदर मुलाखत घेतली होती. यावेळी पिरजादा यांनी प्रश्न विचारला की, चीनशी समतोल साधण्यासाठी अमेरिकेने भारताला महत्त्व देण्याची जुनी रणनीती आता बदलली आहे का? यावर कॅरोल क्रिस्टीन फेअर म्हणाल्या की, मला असे वाटत नाही. हे संबंध प्रस्थापित करण्यासंदर्भात वॉशिंग्टनचे प्रशासन मागच्या २५ वर्षांपासून काम करत आहे.

दुर्दैवाने, ट्रम्प यांच्या प्रशासनातील अनेक अधिकारी त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत. मात्र एकूण प्रशासनाने मागच्या २५ वर्षांपासून संबंध सुधारण्यात बरेच काम केलेले आहे, असेही फेअर म्हणाल्या.

हे संभाषण पुढे जात असताना फेअर यांचा तोल ढासळला आणि त्यांनी ट्रम्प यांच्या प्रशासनाबाबतचा आपला संताप व्यक्त केला. “माझ्यातील आशावाद हे म्हणतो की, नोकरशाही हे सर्व (दोन देशातील संबंध) व्यवस्थित ठेवल. पण माझ्यातील निराशावाद म्हणतो की, आता तर केवळ सहा महिने झाले आहेत. पण आणखी चार वर्ष हा ‘चु**’ इथे असणार आहे”, असे फेअर म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ:

फेअर पुढे म्हणाल्या की, मला माहितीये चार वर्षानंतर मी या देशात राहू शकणार नाही.

यावर पत्रकार डॉ. पिरजादा हसू लागतात. हसत हसत ते म्हणतात की, मी उर्दूमध्ये बोलताना हा शब्द नेहमी वापरतो. आमचे व्ह्यूवर्स त्यावर आक्षेप घेऊ शकतात. पण तुम्ही इंग्रजी चर्चेत तो वापरला. यावर फेअर यांनी पुन्हा एकदा ठासून म्हटले की, ते ‘चु**’ आहेत.

यावर डॉ. पिरजादा म्हणाले की, ‘चु**’ या शब्दाचे महत्त्व असे आहे की, तुम्ही एखादी परिस्थिती हा शब्द उच्चारल्याशिवाय ती व्यवस्थितपणे विशद करू शकत नाहीत.

कोण आहेत कॅरोल क्रिस्टीन फेअर?

कॅरोल क्रिस्टीन फेअर या जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या एडमंड ए. वॉल्श स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिसमधील सुरक्षा अभ्यास कार्यक्रमातील सहयोगी प्राध्यापक आहेत. दक्षिण आशियातील दहशतवाद विरोधी कारवाई आणि राजकीय लष्करी व्यवहार यावर त्यांचा अभ्यास आहे.

फेअर यांनी पाकिस्तानचे सैन्यदल आणि लष्कर-ए-तैयबावर पुस्तके लिहिली आहेत. रोखठोक विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या फेअर अनेकदा वादातही अडकल्या आहेत.