करोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे भारताची लसीकरण मोहिमेची गती मंदावण्याची भीती व्यक्त होत असतानाच, या निर्बंधांचे अमेरिकेने समर्थन केले आहे. अमेरिकी लोकांच्या गरजांची काळजी घेणे हे बायडेन प्रशासनाचे प्रथम कर्तव्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

लशीच्या कच्च्या मालावरील बंदी उठवण्याबाबत भारताच्या विनंतीवर बायडेन प्रशासन केव्हा निर्णय घेईल असा प्रश्न अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांना विचारण्यात आला होता.

‘अमेरिका सध्या देशातील लोकांचे लसीकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात गुंतले असून आतापर्यंत तो यशस्वी ठरला आहे. ही मोहीम सुरू असून आम्ही हे दोन कारणांसाठी करत आहोत. एक म्हणजे अमेरिकी लोकांबाबत आमची विशेष जबाबदारी आहेत. दुसरे कारण म्हणजे, जगातील कुठल्याही देशापेक्षा अमेरिकेला करोनाचा जास्त फटका बसला आहे. आमच्या एकाच देशात साडेपाच लाखांहून अधिक मृत्यू झाले असून, लाखो लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे अमेरिकी लोकांचे लसीकरण होणे केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर उर्वरित जगाच्याही हिताचे आहे’, असे प्राइस यांनी सांगितले.