येत्या आठवडय़ात सेऊलमध्ये होणाऱ्या अणुसाहित्य पुरवठादार गटाच्या (एनएसजी) महत्त्वाच्या बैठकीत भारताला सदस्यत्वासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन या गटाच्या ४८ सदस्यांना करून अमेरिकेने भारताच्या प्रयत्नांना नव्याने बळ दिले आहे.

एनएसजीच्या  बैठकीत भारताचा सदस्यत्वाचा अर्ज विचारासाठी येईल, तेव्हा संघटनेच्या सहभागी सरकारांनी त्याला पाठिंबा द्यावा असे अमेरिका त्यांना आवाहन करते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किरबी म्हणाले.  २४ जूनला सेऊलमध्ये होऊ घातलेल्या एनएसजीच्या बैठकीत सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा असे पत्र या संघटनेच्या सदस्यांना लिहिणाऱ्या अमेरिकेने भारताची पाठराखण केली आहे.  ‘भारताच्या प्रवेशाबाबत सहमतीला अडथळा न आणण्यास मान्यता द्यावी’, अशा आशयाचे पत्र परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी भारताच्या एनएसजीच्या सदस्यत्वाबाबत शंका असलेल्या सदस्यांना पाठवले आहे.

ब्रिटनचा पाठिंबा

एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांना ब्रिटनचा ‘ठाम पाठिंबा’ असल्याची हमी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.