अमेरिकेत नोकरीनिमित्त आवश्यक असलेल्या एच-१बी व्हिसासाठी अर्ज स्वीकारण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नागरिक आणि स्थलांतर सेवा (यूएससीआयएस) विभागाने या बाबत माहिती दिली.
विशेषत: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना या व्हिसाचा उपयोग होतो. ७ एप्रिलपर्यंत या व्हिसासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. मात्र यंदा व्हिसासाठी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता यूएससीआयएसने व्यक्त केली आहे. जर अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीचा वापर करून क्षमतेएवढेच अर्ज स्वीकरण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पद्धतीनुसार जर एखाद्याचा अर्ज नाकारण्यात आला असेल, तर त्याला पुन्हा अर्ज करता येणार नाही आणि त्याने भरलेले शुल्कही त्याला परत मिळणार नाही, असेही यूएससीआयएसने स्पष्ट केले.
अमेरिकेच्या आगामी आर्थिक वर्षांसाठी यूएससीआयएसकडून तब्बल ६५,००० एच१बी व्हिसा वितरित करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबरपासून हे आर्थिक वर्ष सुरू होते. अमेरिकन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या २०००० जणांना पहिल्यांदा हा व्हिसा दिला जाईल, असेही सांगण्यात आले आहे. ६५००० व्हिसांसाठी तब्बल एक लाख ६०,००० अर्ज येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी या व्हिसांसाठी एक लाख २४,०००, तर २०१२मध्ये एक लाख ३४,००० अर्ज आले होते.