मदर ऑफ ऑल बॉम्ब अशा नावाने कुप्रसिद्ध असलेल्या सर्वात मोठ्या नॉन न्युक्लेयर बॉम्बने अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आयसिसच्या तळावर हल्ला केला आहे. नानगरहार या भागातील गुहांमध्ये आयसिसचे दहशतवादी लपलेले आहेत. त्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आल्याचे अमेरिकेनी म्हटले आहे. आज संध्याकाळी ७.३२ वाजता अमेरिकेनी नानगरहार या भागात आचीन जिल्ह्यातील आयसिसच्या तळावर जीबीयू-४३ हा बॉम्ब टाकला. हा बॉम्ब टाकण्यासाठी विमानाचा वापर करण्यात आल्याचे अमेरिकेनी म्हटले आहे.

जीबीयू-४३ बी हा अतिशय मोठा अण्वस्त्रविरहित बॉम्ब आहे. या बॉम्बचे टोपणनाव ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ असे आहे. या बॉम्बचे वजन २१,६०० पाउंड इतके आहे. मॅसिव्ह आर्डनंस एअर ब्लास्ट ही या बॉम्बची प्रणाली आहे. अशा प्रकारचा बॉम्ब एखाद्या संघर्षात वापरण्याची ही अमेरिकेची पहिलीच वेळ आहे. या बॉम्बमध्ये ११ टनाचा ज्वालाग्राही पदार्थ होता अशी माहिती सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते अॅडम स्टम्प यांनी दिली. नानगरघर या भागात आयसिसचे दहशतवादी लपून बसले होते. त्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. या हल्ल्यामध्ये किती दहशतवादी ठार झाले आहेत याची निश्चित माहिती अद्याप संरक्षण मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रध्यक्ष पद सांभाळल्यापासून आयसिस विरोधात मोहीम उघडली होती. याआधी आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने आपले मोसूल येथील तळ सोडल्याचे वृत्त आहे. मोसूलमधून पळून जाण्यासाठी बगदादीने १७ आत्मघातकी कारबॉम्बचा वापर केल्याचे म्हटले गेले आहे. अमेरिकेच्या सहकार्याने इराकी सैन्याने पूर्व मोसूलमध्ये हल्ले केले. त्यामध्ये आयसिसचे ३०० दहशतवादी ठार झाले आहेत.

सिरियामध्ये रासायनिक हल्ला झाल्यानंतर अमेरिकेनी सिरियामध्ये हल्ले केले. रासायनिक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेनी हवाईतळांवर ५०-६० टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा मारा केला. नागरिकांवर करण्यात आलेल्या क्रूर रासायनिक हल्ल्याचा सूड घेण्यासाठी अमेरिकेने सीरियाच्या हवाईतळांवर हल्ले केले. त्यात नऊ जण ठार तर शेकडो जखमी झाले आहेत. अमेरिकेककडून पहाटे ३.४२ वाजता हे हल्ले करण्यात आले होते. त्यात शायरात हवाईतळ जवळपास उद्ध्वस्त झाला आहे. सीरियन ऑब्झव्‍‌र्हेटरी ऑफ ह्य़ूमन राइट्स या संस्थेने म्हटले आहे, की या हल्ल्यात सीरियाचे सात लष्करी अधिकारी ठार झाले आहेत.