उस्मान ख्वाजाची माघार; मॅथ्यू वेडचा समावेश

साखळी फेरीत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीआधीच खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्येने ग्रासले आहे. आघाडीच्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजाने दुखापतीमुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधून माघार घेतली आहे. त्यातच अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस पाठीच्या दुखापतीने त्रस्त असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंता आणखीनच वाढल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात फलंदाजी करत असताना ख्वाजाच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. ऑस्ट्रेलिया संघ १ बाद २० अशा स्थितीत असताना ख्वाजाला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले होते. पण अखेरच्या क्षणी गरज असताना ख्वाजाला पुन्हा फलंदाजीसाठी परतावे लागले होते.

ख्वाजा दुखापतीमुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी मॅथ्यू वेडचा ऑस्ट्रेलियाच्या १५ सदस्यीय चमूत समावेश करण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे विनंती करण्यात आली आहे, असे ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी स्पष्ट केले आहे.

‘‘गेली १२ ते १८ महिने वेड सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया-अ संघाकडून खेळताना दोन शतकेसुद्धा झळकावली आहेत,’’ असे लँगर यांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण तसेच फलंदाजी करत असताना स्टॉइनिसची पाठीची दुखापत उफाळून आली होती. भारताविरुद्ध ९ जून रोजी झालेल्या सामन्यादरम्यान याच दुखापतीमुळे स्टॉइनिस नंतरच्या दोन साखळी सामन्यांत खेळू शकला नव्हता. ‘‘स्टॉइनिसच्या पाठीला वेदना होत असून मंगळवारी एमआरआय स्कॅन काढण्यात येतील, त्यानंतरच त्याच्या दुखापतीचे नेमके स्वरूप समजू शकेल. त्यानंतरच त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड करण्यात येईल,’’ असेही फिंचने सांगितले. याआधी शॉन मार्शने दुखापतीमुळे विश्वचषकातून माघार घेतली होती.