प्रख्यात सरोदवादक आणि पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांच्यासाठी काळजाच्या तुकड्यासारखी असलेली त्यांची ‘सरोद’ विमान प्रवासात गहाळ झाली आहे. ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडनहून भारतात येत असताना हा प्रकार घडला.  हे वाद्य केवळ गहाळ झाले आहे की चोरीला गेले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्वतः अमजद अली खान यांनी घडल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
अमजद अली खान आपल्या पत्नीसमवेत सरोदवादनाच्या कार्यक्रमासाठी लंडनला गेले होते. २८ जूनच्या रात्री ते ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने नवी दिल्ली परतले. दिल्ली विमानतळावरील प्रवासी सामान परत येण्याच्या ठिकाणी त्यांना सरोद असलेली बॅग दिसली नाही. सुमारे ४ ते ५ तास त्यांनी विमानतळावरच थांबून सरोद असलेली बॅग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ती सापडली नाही. त्यानंतर दुसऱया विमानाने सरोद आणली जाऊ शकते, असे त्यांना विमान कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, भारतात परतून ४८ तास झाल्यानंतरही त्यांना सरोद मिळालेली नाही. एवढे मोठे नाव असलेली ब्रिटिश एअरवेजसारखी कंपनी इतक्या निष्काळजीपणे कसे काय वागू शकते, हे मला समजत नाही, अशी भावना अमजद अली खान यांनी व्यक्त केली.
लंडनमधील हिथ्रो विमानतळावरील टर्मिनल ५ वर प्रवाशांच्या सामानासंदर्भात गोंधळ झाला असल्याचे ब्रिटिश एअरवेजने मान्य केले. प्रवाशांच्या वस्तू त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत घेत आहोत. शक्य तितक्या लवकर आम्ही सर्व सामान प्रवाशांपर्यंत पोहोचवू, असे या एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले.