डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे उत्तर प्रदेशमधील जवळपास ४० लोकांना HIVची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ भागात आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आलं होतं. यावेळी रुग्णांच्या तपासणीसाठी एकच सिरिंज वापरण्यात आली आणि त्यातूनच एचआयव्हीची लागण इतर लोकांना झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२०१७ मध्ये काही स्वयंसेवी संस्थांनी इथे आरोग्य शिबीर आयोजीत केलं होतं त्यावेळी या भागातील अनेक लोकांमध्ये एचआयव्हीची लक्षणं त्यांना आढळली होती. सध्या ४० लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे पण, अधिक तपास केला तर कदाचित ५०० हून अधिक लोकांना ही लागण झाल्याचंही समोर येऊ शकतं अशी दुसरी धक्कादायक माहिती एका अधिकाऱ्यानं एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. कमी किमतीत उपचार व्हावे यासाठी येथे आलेल्या रुग्णांना एकच सिरिंज वापरण्यात आली अशी माहिती स्थानिकांनी दिली.

टाईम्स नाऊच्या माहितीनुसार या परिसरात तीन आरोग्य शिबिर चालवण्यात आले, त्यात जवळपास ४०० हून अधिक लोक तपासणीसाठी आले होते. यात तपासणीनंतर ४० जणांमध्ये एचआयव्हीची लक्षणं आढळली असून त्यातील २० जणांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणात कसून तपासणी केली जात असून, ज्यांनी विना परवाना हे शिबीर चालवलं होतं त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं राज्य आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.