मुंबई, जालंधर आणि बिजनोरमधून आयसिस या दहशतवादी संघटनेच्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संयुक्त मोहीम राबवत ही कारवाई केली आहे.

इराक, सीरियासह जगभरात आपल्या क्रूरकृत्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या आयसिस या दहशतवादी संघटनेत भारतात हल्ला घडवण्यासाठी नवीन तरुणांची भरती सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार दिल्ली पोलिसांची विशेष शाखा आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने गुरुवारी देशभरात कारवाई केली. यामध्ये संबंधीत राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेण्यात आली.
पोलिसांनी आणखी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाच राज्यांमध्ये गुरुवारी छापेमारी केली. पोलिसांनी बिजनोरमधील बरहापूर, पंजाबमधील जालंधर आणि मुंबईतून पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली. नवीन तरुणांना संघटनेत सामील करुन घेण्याचे काम हे तिघे संशयित करत होते असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयसिस या दहशतवादी संघटनेने मुंबईत २६/११ सारखा हल्ला घडवण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. सागरी मार्गाने हे दहशतवादी मुंबईत प्रवेश करतील असा इशाराही गुप्तचर यंत्रणांनी दिला होता.