उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघाताला बळी पडलेली डबल डेकर बस पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या अपघातात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बाराबंकी येथे पहाटे पाचच्या सुमारास एक व्होल्वो बस आणि ट्रक एकमेकांना धडकले. या अपघातात नऊ जणांच्या मृत्यूसह २७ जण जखमी झाले आहेत.

हा अपघात बाराबंकी शहरापासून वीस किलोमीटर दूर देवा पोलीस स्टेशन परिसरातील रोडवर झाला. चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाळूच्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात डबल डेकर बस चक्काचूर झाली. अपघातानंतर चालक पळून गेला. हा ट्रक दिल्लीहून बहराइचउत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील किसान मार्गावर दिल्लीहून बहराइचकडे जाणारी बस आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नऊ बस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत २७ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील ५ जणांना ट्रॉमा सेंटर लखनऊ येथे पाठवण्यात आले आहे. अपघातातील मृतांचे शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.

गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास दिल्लीहून बहराइचकडे जाणारी बस देवा कोतवाली परिसरातील किसान मार्गावरील बाबूरी गावाजवळ पोहोचली. समोरून येणारा ट्रक अचानक बसवर आदळला. ट्रकचा वेग इतका जास्त होता की बसचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस दल आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बस आणि ट्रक कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले जेथे डॉक्टरांनी नऊ लोकांना मृत घोषित केले. मरण पावलेल्यांमध्ये रेहमान (४२) रा. आलापूर बाराबंकी वगळता इतर कोणत्याही प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाराबंकी येथे झालेल्या अपघातातील मृतांबद्दल शोक व्यक्त केले आणि पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.