Uttar Pradesh Barabanki stampede News : उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज (२८ जुलै) श्रावणी सोमवार असल्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. दरम्यान, बाराबंकीमधील हैदरगढ येथील प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराबाहेरच्या पत्र्याच्या शेडमध्ये भाविक रांगा लावून उभे होते. तर, मंदिरात जलाभिषेक चालू होता. त्याचवेळी शेडमध्ये काही भाविकांना विजेचा धक्का बसला, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. भाविक धावपळ करू लागले. या दुर्घटनेत दोन भाविकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक जण चेंगराचेंगरी व वीजेच्या होरपळून जखमी झाले आहेत.

बाराबंकीमधील लोनीकटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुबारकपुरा या गावातील रहिवासी असलेला प्रशांत (२२) व त्याच्यात गावातील आणखी एका भाविकाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी व इतर भाविकांनी मिळून या दोघांना त्रिवेदीगंज सीएचसी रुग्णालयात नेलं होतं. तिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे तीन वाजण्याच्याा सुमारास ही घटना घडली. मंदिराच्या बाहेर भाविकांच्या लांब रांगा लागलेल्या असताना शेडमध्ये गोंधळ झाला. लोकांची धावपळ सुरू झाली आणि त्यातून चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यावेळी मंदिरात जलाभिषेक चालू होता.

वानरामुळे घडली दुर्घटना

काही भाविकांनी सांगितलं की भाविक पत्र्याच्या शेडमध्ये रांगेत उभे होते. त्याचवेळी एका वानराने विजेच्या तारेवर उडी घेतली. त्यामुळे तार तुटली आणि पत्र्याच्या शेडवर कोसळली. पत्र्याच्या शेडखाली उभ्या लोकांना विजेचा धक्का बसला आणि एकच गोंधळ उडाला, लोकांची धावपळ सुरू झाली. त्यातून चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना त्रिवेदीगंज येथील रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसह अनेक प्रशासकीय अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू

या घटनेच्या एक दिवस आधी हरिद्वारमधील एका मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. येथील मनसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जण दगावले आहेत. तसेच या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले आहेत.