उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये उद्घाटनावेळी नारळ तोडताना नव्याने बांधलेला रस्त्यावर खड्डा पडल्याने सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर उद्घाटनासाठी आलेल्या आमदार सुची मौसम चौधरी यांनी प्रशासनाकडे चौकशीची मागणी करून आंदोलन केले. रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आणि रस्त्यात निकृष्ट साहित्य वापरण्यात आल्याचा सुची चौधरी यांनी आरोप केला. रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळी नारळ फोडला तेव्हा नारळ फुटला नाही तर रस्ताच फुटला. त्यामुळे रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाले.

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये पाटबंधारे विभागाने हल्दौरजवळील बालकिशनपूर चौकातून जाणाऱ्या कालव्याच्या ट्रॅकवर रस्ता तयार केला होता. सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे उद्घाटन गुरुवारी करण्याचे ठरले होते. दुपारी आमदार सुची मौसम चौधरी नव्याने बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचल्या. विधिवत पूजन केल्यानंतर त्यांना नारळ फोडण्यासाठी दिला असता आमदारांनी रस्त्यावर नारळ फोडून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला असता नारळ फुटला नाही मात्र रस्ता त्या ठिकाणाहून तुटला आणि खडी बाहेर आली. या प्रकाराने संतप्त झालेल्या आमदारांनी लोकार्पण करण्याचा कार्यक्रम टाळला.

रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केल्याने यावरून बराच गदारोळ झाला. आमदार आणि त्यांचे पती ऐश्वर्या चौधरी हे देखील स्थानिक लोकांसह आंदोलनासाठी बसले. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले आणि चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आणि त्यानंतर आमदारांनी आंदोलन संपवले.

दरम्यान, याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रस्त्याचे बांधकाम दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाले असून, तक्रार आल्यानंतर दुसऱ्या विभागाचे तांत्रिक पथक तपासासाठी पाठवण्यात आले आहे. रस्त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.