या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या जलप्रलयातील मृतांचा आकडा मंगळवारी ३२ वर पोहोचला. तीन दिवसांपासून शोधकार्य आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अद्यापही जवळपास १७० जण बेपत्ता आहेत.

चमोली जिल्ह्यात रविवारी हिमकडा कोसळल्यानंतर अलकनंदा नदीला महापूर आला होता. त्यात तपोवन ऋषीगंगा वीज प्रकल्पांची हानी झाली आहे. जलप्रलयामुळे मृत्युमुखी पडलेल्या आणखी सहा जणांचे मृतदेह मंगळवारी हाती लागले. त्यामुळे मृतांची संख्या ३२ वर पोहोचली असून, अजूनही १७० जण बेपत्ता आहेत.

तपोवन वीज प्रकल्पाचा बोगदा हा शोधकार्याचे केंद्र ठरला आहे. तिथे ३५ जण अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदतकार्यात ड्रोनसह अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. या १.९ किलोमीटरच्या बोगद्यातून ढिगारा हटविण्याचे काम वेगाने सुरू असले तरी अद्याप तरी त्यातून फारी काही हाती लागलेले नाही. मंगळवारी बोगद्याचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले. बोगदा मातीचा ढिगारा, चिखलाने भरला असून, त्यात कुठे पोकळी दिसते का, हे तपासण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोगद्यात पोकळी असल्याचे निष्पन्न झाल्यास तिथे मजूर अडकलेले आहेत, असे गृहीत धरून बचावकार्य राबविण्यात येईल, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुर्घटनास्थळी ‘आयटीबीपी’, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, राज्य आपत्ती निवारण पथकासह अनेक संस्था संयुक्तपणे मतदकार्य करत आहेत. मलारी येथील पूल कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, हेलिकॉप्टर्सद्वारे मदत पोहोचवण्यात येत आहे. या भागात मदतीसाठी ड्रॅगन लाइट सेट, ऑक्सिजन सिलिंडर, स्ट्रेचर्स पाठवण्यात आले आहेत.

रैनी गावाच्या परिसरात ऋषीगंगा वीज प्रकल्पाजवळ ढिगारे, चिखल हटविण्यात आल्यानंतर मृतदेह आढळू लागले आहेत. मंगळवारी तिथे चार मृतदेह आढळले.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मंगळवारी या भागाची हवाई पाहणी केली. तसेच त्यांनी जोशीमठ येथील आयटीबीपी रुग्णालयास भेट दिली. बोगद्यातून सुटका करण्यात आलेल्या १२ कामगारांचीही त्यांनी भेट घेतली.

ड्रोनचा वापर मंगळवारी पाच कॅमेऱ्यांसह ड्रोन तपोवन बोगद्यात सोडण्यात आला. दुपापर्यंत ‘एनडीआरएफ’ आणि ‘आयटीबीपी’चे जवान बोगद्याच्या ९० मीटर आतपर्यंत पोहोचले. ड्रोन बोगद्यात १२० मीटपर्यंत पोहोचला. मात्र, ड्रोनद्वारे मिळालेल्या छायाचित्रांमध्ये मानवाच्या अस्तित्वाचे संकेत मिळू शकले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand accident 170 still missing abn
First published on: 10-02-2021 at 00:27 IST