डेहराडून : उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील मान गावाजवळ झालेल्या हिमस्खलनानंतर बर्फाखाली अडकलेल्या आणखी तीन कामगारांचे मृतदेह रविवारी सापडले. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता सातवर पोहोचली असून आणखी एका बेपत्ता कामगाराचा शोध तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.

लष्कराच्या सीमा रस्ते संघटनेच्या छावणीवर शुक्रवारी हिमकडे कोसळल्यानंतर त्याखाली ५४ कामगार अडकले होते. त्यानंतर शोध मोहिमेत ४७ कामगारांना वाचवण्यात यश आले. त्यापैकी ४६ जणांना ज्योतिर्मठातील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मणक्याला इजा झालेल्या अन्य एका कामगाराला ऋषिकेश येथील एम्समध्ये पाठवण्यात आले आहे अशी माहिती लष्कराच्या डॉक्टरांनी दिली. एकूण तीन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी चामोलीमधील हवामान बिघडण्याची शक्यता असल्यामुळे त्यापूर्वीच बेपत्ता कामगाराचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हेलिकॉप्टर, कुत्रे आणि ‘थर्मल इमेजिंग’ तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ज्योतिर्मठ येथे पाठवण्यात आले आहेत.