उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेले ४१ कामगार सुरक्षित असल्याची चित्रफीत मंगळवारी ‘एनडीएमए’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) जारी केली. सर्व कामगार सुखरूप असून आता त्यांच्या सुटकेसाठी नवी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बचाव पथकांनी मंगळवारपासून आडव्या दिशेने खोदकाम करण्यास सुरूवात केली आहे. ‘बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी एकाच वेळी पाच आघाड्यांवर प्रयत्न चालू आहेत. सध्याच्या परिस्थितीत उभ्या दिशेने खोदकाम करताना खडक लागत असल्यामुळे आडव्या दिशेने खोदण्यावर भर दिला जात आहे. या बचाव मोहीमेचा आजचा ११ वा दिवस आहे.

दरम्यान, मजुरांना एका सहा इंची नलिकेद्वारे, पाणी आणि अन्न पुरवलं जात आहे. मंगळवारी या नलिकेतून एक कॅमेरा आत पाठवून सर्व कामगारांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. आतापर्यंत बोगद्याच्या प्रवेश बिंदूपासून अमेरिकन ऑगर मशीनद्वारे तब्बल ४२ मीटरपर्यंत ८०० मिमी (३२ इंच) रुंद पाईप ड्रिल करण्यात आली आहे. म्हणजेच मजुरांना बाहेर काढण्यासाठी नलिका तयार करण्यात आली आहे. खोदकामाचं उर्वरित काम आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर एक ३२ इंच रुंद पाईप आत सोडली जाईल, ज्यामधून मजूर बाहेर येतील.

उत्तराखंड राज्य परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी महमूद अहमद म्हणाले ऑगर ड्रिलिंग मशीन आणि इतर यंत्रसामग्रीद्रारे आतापर्यंत ३९ मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण करण्यात आलं आहे. आमच्या अंदाजानुसार आम्हाला ५७ मीटरपर्यंत ड्रिलिंग करावं लागणार आहे. त्यामुळे अजून १८ मीटरचं ड्रिलिंग बाकी आहे. हे ड्रिलिंग पूर्ण होताच मजुरांना बाहेर काढणं शक्य होईल.

हे ही वाचा >> सुटकेच्या आशा पल्लवित; बोगद्यात अडकलेले कामगार सुरक्षित असल्याचे चित्रफितीतून स्पष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महमूद अहमद म्हणाले, आत्ताच काही सांगणं ही थोडी घाई ठरेल. परंतु, रात्री उशिरापर्यत आपल्याला आनंदाची बातमी मिळू शकते. मजुरांना आज सकाळी टूथब्रश-टूथपस्ट, टॉवेल, अंडरगार्मेंट्स आणि नाश्ता पाठवण्यात आला. मजुरांनी मोबाईल आणि चार्जरची मागणी केली होती. या वस्तूदेखील पाठवण्यात आल्या आहेत. सर्व मजूर ठीक आहेत.