पोलीस स्टेशमध्ये नेहमी गुन्हेगारांना आणले जाते. आरोपींना समज दिली जाते. पण रविवारी उत्तर प्रदेशच्या कौशंबी जिल्ह्यातील कोखराज पोलीस स्टेशनमध्ये एक वेगळी घटना घडली. पोलिसांची लगबग सुरु होती. पोलीस स्टेशन लग्नाचा हॉल बनला होता. पोलिसांनी तक्रार घेऊन आलेल्या एका विधवा महिलेचे तिच्या दीराबरोबर लग्न लावून दिले.

दोन वर्षांपूर्वी सुनिताच्या पहिल्या पतीचे राजेश कुमारचे निधन झाले. चार वर्षांपूर्वी सुनिता आणि राजेशचे लग्न झाले होते. पतीच्या निधनानंतर सुनिताला सासरी छळ सुरु होता. मुलीचा सासरी सुरु असलेला हा छळ पाहून तिची आई पार्वती देवीने कोखराज पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर सासू-सासऱ्यांकडून आपल्या मुलीचा छळ सुरु आहे असा अर्ज पार्वती देवींनी पोलिसांना दिला. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करुन तोडगा काढावा अशी विनंती पार्वती देवींनी पोलिसांना केली.

तीन महिन्यांपूर्वी सुनीताने आपल्या नवऱ्याचे घर सोडले व ती तिच्या आई-वडिलांकडे रहायला आली. रविवारी कोखराज पोलीस स्टेशनचे अधिकारी अजीत कुमार पांडे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी सुनिताचे सासू-सासरे आणि तिच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. पोलिसांनी दोन्ही पक्षांबरोबर चर्चा केली. त्यानंतर सुनिताची सासू ओमवती धाकटा मुलगा मंजीत कुमार बरोबर सुनिताचे लग्न लावून देण्यास तयार झाली.

दोन्ही पक्ष तयार झाल्यानंतर पोलिसांनी भटजीला पाचारण केले व पोलीस स्टेशन लग्नाचा हॉल बनवला. लग्नामध्ये काही कमतरता राहू नये यासाठी पोलिसांनी स्थानिक वादकांनाही बोलवून घेतले. त्यानंतर पोलीस स्थानकातच सुनिता आणि मंजीत कुमारचे धुमधडाक्यात पोलिसांनी लग्न लावून दिले.