लष्कराचे गुप्तचर पथक स्थापन करून त्यासाठीच्या निधीचा गैरवापर केल्याच्या संदर्भातील अहवाल विशिष्ट हेतूने प्रेरित असून जम्मू-काश्मीर सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप खोडसाळ स्वरूपाचा आहे, असे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांनी आज येथे सांगितले. जनरल सिंग यांनी लष्कराचे गुप्तचर पथक स्थापन करून जम्मू-काश्मीर सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले, तसेच निधीचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर केला, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ ने भाटिया अहवालाच्या आधारे दिल्यानंतर एकच खळबळ उडाली व तो राजधानीत चर्चेचा विषय झाला होता.
तांत्रिक मदत विभाग म्हणजे टीएसडीचा अनधिकृत कामांसाठी गैरवापर करून आर्थिक गैरप्रकार केल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, लष्कर व संरक्षण मंत्रालय यांना या पथकाच्या स्थापनेत चौकशीमध्ये काहीही आक्षेपार्ह सापडलेले नाही व त्यांनी ते प्रकरण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांकडे बंद करण्यासाठी पाठवले होते. याबाबत सादर करण्यात आलेल्या लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया अहवालाच्या आधारे देण्यात आलेले वृत्त विशिष्ट हेतूने प्रेरित असून त्यामागे आपण भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मंचावर असण्यापासून इतर अनेक कारणे आहेत. शस्त्रास्त्र दलालांचे लागेबांधे आहेत, त्याचाही याच्याशी संबंध आहे.
माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांनी सांगितले की, सरकारने हे प्रकरण बंद करून एनएसएकडे पाठवले आहे, त्यानंतर संरक्षण मंत्रालयाचे सह सचिव तेथून गेले, त्यानंतरच्या काळात आपल्याविरोधातील हा अहवाल फुटला आहे. भारतीय लष्कराने टीएसडीची स्थापना ही संरक्षण मंत्री ए.के.अँटनी व एनएसए यांच्या पूर्ण संमतीने केली  होती, असे जनरल सिंग यांनी सांगितले.