हरयाणातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे  जावई रॉबर्ट वडेरा यांच्याभोवतीचे फास आवळण्यास केंद्र सरकारने सुरूवात केली. आयकर विभागाने वडेरा यांच्या ‘स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी’ या कंपनीला नोटीस बजावल्याचे समजते. कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याला बजावण्यात आलेल्या या नोटीसीमध्ये कंपनीच्या वादग्रस्त जमीन आणि आर्थिक व्यवहारांविषयी आयकर विभागाने स्पष्टीकरण मागविले आहे. हरयाणातील डीएलएफ कंपनीबरोबरच्या वादग्रस्त जमीन व्यवहारावरून ‘स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी’ ही कंपनी वादाच्या केंद्रस्थानी आहे. मनेसार आणि हरयाणात ‘स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी’च्या मालकीची ३.५३ एकर तर बिकानेर आणि राजस्थानमध्ये कंपनीच्या मालकीची तब्बल ४७० एकर जमीन आहे. आयकर विभागाने हरयाणात ‘स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी’ने डीएलएफ आणि ओमकारेश्वर प्रॉपर्टीज यांच्याबरोबर केलेल्या आर्थिक व्यवहारांचे तपशील मागवले आहेत. या सगळ्याविषयी रॉबर्ट वडेरा यांनी बोलण्यास नकार दिला आहे.