पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे अनेक मंत्री सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्यावर मंत्र्यांचा भर असतो. पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या दिवशी ट्विटदेखील करतात. जयंती, पुण्यतिथी, सण, उत्सव या दिवशी पंतप्रधान मोदी आवर्जून ट्विट करतात. पंतप्रधान मोदींचे अनुकरण त्यांचे मंत्रीदेखील करताना दिसतात. पंतप्रधान मोदींचे असेच अनुकरण करताना त्यांच्या एका सहकाऱ्याकडून चूक झाली आहे.

केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करताना एक चूक केली आणि त्यांची चूक सोशल मीडियावरील अनेकांच्या लक्षात आली. व्यंकय्या नायडू यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त ट्विट केले होते. मात्र त्यांनी या ट्विटमध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्याऐवजी लोकमान्य टिळकांचा फोटो वापरला होता. व्यंकय्या नायडूंना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी ट्विट लगेच डिलीट केले. मात्र त्याआधी अनेकांना त्यांची चूक लक्षात आली होती आणि त्यांनी नायडूंना त्यांची चूक निदर्शनासदेखील आणून दिली होती. कृतिका द्विवेदी नावाच्या एका ट्विटर वापरकर्तीने नायडूंच्या ट्विटचा स्क्रिनशॉटदेखील पोस्ट केला.

आज (९ मे) रोजी समाजसुधारक आणि विचारवंत गोपाळ कृष्ण गोखले यांची जयंती आहे. गोखले यांच्या योगदानाची आठवण म्हणून व्यंकय्या नायडू यांनी ट्विट केले होते. नायडू यांच्या ट्विटला कृतिका द्विवेदी नावाच्या ट्विटर वापरकर्तीने प्रत्युत्तर दिले. ‘हे ट्विट व्यंकय्या नायडू यांच्या सोशल मीडिया टिमने केलेले असेल. मात्र हे ट्विट अतिशय बेजबाबदारपणे करण्यात आले आहे,’ अशी प्रतिक्रिया नायडूंच्या ट्विटवर करण्यात आली आहे. यासोबतच नायडू यांना चांगल्या सोशल मीडिया टिमची आवश्यकता असल्याचे ट्विटदेखील करण्यात आले आहे. अनेकांनी चूक लक्षात आणून देताच नायडू यांनी ट्विट डिलीट केले.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अग्रेसर राहिलेले गोपाळ कृष्ण गोखले राजकारणातील तज्ज्ञ होते. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी महाराष्ट्रातील कोहटमध्ये झाला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी गोपाळ कृष्ण गोखले यांना राजकीय गुरु मानत होते.