प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख यांचे शुक्रवारी दुबईत हृदयविकाराने अकस्मात निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांद्वारे रसिकांत लोकप्रिय झालेले फारुख शेख यांच्या निधनाने समांतर चित्रपटाच्या चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
एका कार्यक्रमासाठी कुटुंबियांसह दुबई येथे आले असताना शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका बसला व त्यातच त्यांचे निधन झाले. दुबईतील सोपस्कार पूर्ण केल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी रूपा व शाइस्ता आणि सना या दोन कन्या असा परिवार आहे.
वकिलीचे शिक्षण घेत असतानाच फारुख शेख यांनी नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गरम हवा’ या फाळणीवर आधारित चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच काळात हिंदी चित्रपटसृष्टीत येऊ घातलेल्या समांतर चित्रपटांच्या प्रवाहात ते सामील झाले व ७०-८०च्या दशकात अनेक समांतर चित्रपटांतून दर्जेदार भूमिका वठवल्या. ‘शतरंज के खिलाडी’, ‘उमराव जान’, ‘बाजार’, ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’ हे त्यांचे चित्रपट केवळ समीक्षकांच्याच नव्हे तर सामान्य प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरले. सत्यजित राय, श्याम बेनेगल, हृषीकेश मुखर्जी यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2013 रोजी प्रकाशित
अभिनेते फारुख शेख यांचे निधन
प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले

First published on: 29-12-2013 at 02:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor farooq sheikh dies in dubai after suffering a heart attack