देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन अरुण जेटलींना लक्ष्य केल्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदींच्या काळात काश्मीरची भारताशी नाळ तुटल्याची टीका सिन्हा यांनी केली. काश्मीर प्रश्नामुळे व्यथित झालो असून दिवसागणिक काश्मीरमधील स्थिती भीषण होत चालल्याचेही त्यांनी म्हटले.

‘जम्मू काश्मीरमधील लोकांच्या मनात दुरावलेपणाची भावना आहे. यामुळे मी व्यथित आहे. मोदींच्या काळात काश्मीरची भारताशी नाळ तुटली आहे. आपण काश्मिरी लोकांचा विश्वास गमावला आहे. तुम्ही काश्मीरला भेट दिल्यास, ही बाब तुमच्या लक्षात येईल,’ असे सिन्हा यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. सिन्हा कन्सर्न्ड सिटिझन्स ग्रुप (सीसीजी) हा संघटनेचे नेतृत्त्व करतात. या संघटनेने अनेकदा काश्मीर खोऱ्याला भेट दिली आहे. काश्मीर खोऱ्यातील समस्या सोडवण्याचा उपाय शोधण्याचा प्रयत्न या संस्थेकडून सुरु आहे.

कन्सर्न्ड सिटिझन्स ग्रुपमध्ये निवृत्त न्यायाधीश ए. पी. शाह, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जे. एफ. रिबेरा, वजाहट हबीबुल्लाह, ए. एस. दौलत, अरुणा रॉय आणि रामचंद्र गुहा यांचा समावेश आहे. या संघटनेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्नाचा आढावा घेतल्यावर यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र तब्बल १० महिन्यांनंतरही त्यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही, असे सिन्हा यांनी सांगितले. मोदींनी प्रतिसाद न दिल्याने वाईट वाटल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.

‘मला वाईट वाटले. मला खूप दु:ख झाले. मी त्यांच्याकडे १० महिन्यांपूर्वी वेळ मागितली होती. मात्र त्यांनी मला वेळ दिली नाही. मी सार्वजनिक जीवनात सक्रीय असल्यापासून आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने मला भेटीसाठी वेळ नाकारली नव्हती. राजीव गांधींपासून सर्वच पंतप्रधानांनी मला भेटीसाठी वेळ दिली. ‘तुमच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही,’ असे आतापर्यंत मला कोणत्याही पंतप्रधानाने म्हटले नाही,’ असे सिन्हा यांनी म्हटले. ‘आतापर्यंत मला सर्वच पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ दिली. मात्र माझ्या स्वत:च्या पंतप्रधानांनी मला भेटीसाठी वेळ नाकारली. आता यापुढे एखाद्या व्यक्तीने मला याबद्दल बोलण्यासाठी फोन केल्यास मी त्याच्याशी बोलणार नाही. कारण वेळ निघून गेलेली आहे,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.