बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक जॉनी बक्षी यांचे निधन झाले आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची करोना चाचणी करण्यात आली. पण रिपोर्ट येण्यापूर्वीच आज पहाटे त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमित खन्ना यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला जॉनी बक्षी यांच्या निधनाची माहिती दिले. अमित आणि जॉनी हे दोघे खास मित्र होते. ‘श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे जॉनी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना न्यूमोनिया झाल्याचे समजले. तसेच त्यांची करोना चाचणी करण्यात आली. पण आज पहाटे करोना चाचणीचे रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले’ असे अमित यांनी म्हटले आहे.

जॉन बक्षी यांनी ‘मंजिले और भी है’, ‘रावण’, ‘मेरा दोस्त मेरा दुश्मन’, ‘भैरावी’ असे अनेक चित्रपट केले. त्यांचा अखेरचा चित्रपट ‘कजरारे’ ठरला आहे. हा चित्रपट २०१०मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हिमेश रेशमियासोबत सारा लॉरेन आणि अमृता सिंह मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या.