अलाहाबाद येथे विश्व हिंदू परिषदेचा नेता अभिषेक यादवला एका मुस्लिम कार्यक्रमात बुरखा घालून महिलांची छेडछाड करताना पकडण्यात आले. शनिवारी (दि. ८) अलाहाबाद येथील ट्रान्स-गंगा परिसरात मोहरम निमित्त आयोजित मिलाद कार्यक्रमात अभिषेक यादव बुरखा घालून महिलांमध्ये घुसला होता. तिथे त्याने महिलांची छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपस्थित लोकांनी पकडून त्याची यथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार विश्व हिंदू परिषदेचा नेता अभिषेक यादवबरोबर त्याचा एक सहकारीही होता. चिडलेल्या लोकांनी या दोघांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी अभिषेक आणि त्याच्या सहकाऱ्यावर महिलांची छेडछाड करणे आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक आणि त्याचा सहकारी कार्यक्रमावेळी महिलांमध्ये बसून त्यांची छेडछाड करत होता असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना रूग्णालयात दाखल केले आहे.
अभिषेक यादवच्या कुटुंबीयांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी सुमारे सात ते आठ लोकांविरोधात अभिषेक यादवचा भाऊ वीरू यादव याने तक्रार दाखल केली आहे. अभिषेक हिंदू असल्यामुळे त्याला मारून टाकण्याचा संबंधित लोकांचा प्रयत्न होता असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दोन्ही गटांची तक्रार दाखल करून घेतली असून तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vhp neta caught in burqa harassing woman at allahabad
First published on: 10-10-2016 at 15:38 IST