नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. संसदेमध्ये मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार निवृत्त न्या. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. ‘इंडिया’ आघाडीची किमान १२ मते फुटल्याचे मानले जात आहे.
संसदेच्या दोन्ही सदनांमधील ७८१ पैकी ७६८ सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ७५२ वैध, तर १५ मते अवैध ठरली. भारत राष्ट्र समितीचे ४, बिजू जनता दलाचे ७, शिरोमणी अकाली दल व अपक्ष प्रत्येकी एक अशा १३ सदस्यांनी मतदान केले नाही. एकूण ९८.२ टक्के मतदान झाल्याचे राज्यसभेचे महासचिव निवडणूक अधिकारी पी. सी. मोदी यांनी जाहीर केले. बहुमतासाठी ३८५ संख्याबळाची गरज होती. भाजपच्या ‘एनडीए’ आघाडीकडे लोकसभेत २९३ तर राज्यसभेत १३३ अशा ४२६ सदस्यांचे पाठबळ होते. शिवाय, वायएसआर काँग्रेसच्या लोकसभेतील ४ व राज्यसभेतील ७ अशा ११ खासदारांची मतेही मिळण्याची खात्री होती. त्यामुळे ‘एनडीए’चे उमेदवार राधाकृष्णन यांना ४३७ सदस्यांचा पाठिंबा अपेक्षित होता. काही छोट्या पक्षांनीही राधाकृष्णन यांच्या पारड्यात मतदान केल्याचे मानले जाते. त्यामुळे ‘एनडीए’ आघाडीला सुमारे ४४० मते मिळण्याची शक्यता मानली गेली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांना १२ मते अधिक मिळाली.
काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीकडे ३१५ मते होती. त्यामध्ये लोकसभेतील २३० व राज्यसभेतील ७६ मतांचा समावेश होता. तसेच दोन्ही सभागृहांतील ९ अपक्षांचाही त्यांना पाठिंबा असल्याचे मानले गेले. आम आदमी पक्ष इंडिया आघाडीमध्ये नसला तरी लोकसभेतील ३ व राज्यसभेतील ९ अशी १२ मते इंडिया आघाडीचे उमेदवार रेड्डी यांना दिली जातील असे ‘आप’ने जाहीर केले होते. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीला ३२७ मते मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात विरोधकांना ३०० मते मिळाली.
कोणत्या पक्षांची मते फुटली?
काँग्रेसचे नेते व राज्यसभेतील खासदार जयराम रमेश यांनीच इंडिया आघाडीकडे ३१५ मते होती व प्रत्येक सदस्याने मतदान केल्याचे ट्वीट करून जाहीर केले होते. अवैध ठरलेली १५ मते ‘इंडिया’ आघाडीची मानली तरी इंडिया आघाडीला ३१२ मते (‘आप’ची मते धरून) मिळायला हवी होती. मात्र, ही १२ मतेही मिळाली नाहीत. त्यामुळे ‘आप’च्या १२ खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केले किंवा ‘इंडिया’ आघाडीतील १२ मते एनडीएच्या पारड्यात पडली असा अर्थ निघू शकतो. जर आपच्या स्वाती मालिवाल यांनी एनडीएला मतदान केले असेल तर ‘इंडिया’ आघाडीला किमान ३११ मते तरी मिळायला हवी होती. शिवसेना- ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट या दोन्ही पक्षांतील खासदारांना महायुतीतील नेत्यांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. मात्र, ‘इंडिया’ आघाडीतील कोणत्या पक्षांची मते फुटली हे अजून स्पष्ट झालेले नाही. अवैध ठरलेली १५ मते एनडीए आघाडीची मानली तर ‘इंडिया’ आघाडीतील फुटीर मतांची संख्या आणखी वाढेल. ही आकडेवारी पाहता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले.