नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनानं प्रजासत्ताक दिनापासून वेगळं वळण घेतलं आहे. हिंसाचार झाल्यानंतर काही संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली. तर दुसरीकडे गाझीपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, गुरूवारी रात्री शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घुसखोर असल्याचा आरोप करत एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली.

सिंघू बॉर्डरबरोबरच दिल्ली सीमेवरील महत्त्वाच्या असलेल्या गाझीपूर येथेही शेतकऱ्यांनी मुक्काम ठोकलेला आङे. गुरूवारी रात्री गाझीपूर आंदोलनस्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं, मात्र कायदे मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे.

आणखी वाचा- कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर आत्महत्या करेन – राकेश टिकैत

दरम्यान, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेते गुरुवारी उपोषणाला बसले. यावेळी एका व्यक्तीने व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाब्दिक चकमक झाली. त्यातच राकेश टिकैत यांनी व्यासपीठावर जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली. संबंधित व्यक्तीचा शेतकरी संघटनेशी संबंध नाही. तो घुसखोर असून, भाजपाशी संबधित आहे, असा आरोप टिकैत यांनी केला.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन : “स्वत:ला राष्ट्रवादी म्हणणाऱ्या या सरकारला…”; ना’राजीनाम्या’मुळे ज्येष्ठ नेत्याची भाजपाला सोडचिठ्ठी

“ती व्यक्ती आमच्या संघटनेची सदस्य नाही. तो लाठी घेत होता आणि काहीतरी केलं असतं. तो माध्यमांशीही चुकीचं वर्तन करत होता. जे कुणी इथे वाईट हेतूनं आले असतील, त्यांनी इथून निघून जावं,” असं टिकैत यांनी यावेळी सांगितलं.

गाझीपूर सीमेवर तणाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेश पोलिसांनी शेतकऱ्यांना हटविण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर गुरुवारी गाझीपूर सीमेवर तणाव निर्माण झाला. मात्र, कोणत्याही स्थितीत शेतकरी गाझीपूर सीमेवरून मागे हटणार नाहीत, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. गाझीपूरजवळ कोणताही हिंसाचार झालेला नाही. मात्र, उत्तर प्रदेश पोलीस दडपशाही करत आहे, अशी टीका टिकैत यांनी केली. गाझीपूरजवळ मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत संघर्षांची स्थिती निर्माण झाली होती.