उत्तर प्रदेशात चार महिन्यातील तिसऱ्या घटनेत एका स्थानिक दूरचित्रवाणीच्या पत्रकाराला गोळ्या घालून ठार करण्यात आले. येथील धीना भागात शनिवारी रात्री ही घटना घडली असून मोटारसायकलवरून आलेल्या समाजकंटकांनी हेमंत यादव (वय४५) या पत्रकाराला ठार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिस अधीक्षक अमित वर्मा यांनी सांगितले की, या पत्रकारास जखमी अवस्थेत रूग्णालयात नेले असता तो मरण पावला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी पाठवला असून अज्ञात व्यक्तीविरूद्ध चांदोली येथील पोलीस स्थानकामध्ये पत्रकाराच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. जूनमध्ये पत्रकार जगेंद्र सिंह यांना शहजहानपूर येथे त्यांच्या घरावर छापा टाकून नंतर पेटवून ठार मारण्यात आले होते. पोलिसांनीच त्यांना पेटवून ठार केल्याचा आरोप आहे, ८ जूनमध्ये त्यांचे निधन झाले होते. त्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मंत्र्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.सिंह यांनी फेसबुक पोस्टवर मंत्र्यांच्या बेकायदा खाणींच्या कारवायांबाबत पर्दाफाश केला होता. दुसऱ्या एका घटनेत बरेली जिल्ह्य़ातील हिंदूी दैनिकाचे अर्धवेळ पत्रकार संजय पाठक यांची दोघांनी हत्या केली होती. त्यांच्या डोक्यात वार करण्यात आले, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video journalist shot to death in uttar pradesh
First published on: 05-10-2015 at 04:11 IST