राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल (१४ सप्टेंबर) राजस्थान दौऱ्यावर होते. भाजपाच्या ‘परिवर्तन संकल्प यात्रा-३ अंतर्गत त्यांनी राजस्थानातील विविध जिल्ह्यांत जाऊन लोकांशी संवाद साधला. यावेळी, अजमेरमध्ये त्यांची जनसभा सुरू असताना अचानक पावसाने एन्ट्री घेतली. मात्र, पाऊस सुरू झाल्यानंतरही फडणवीसांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर छत होतं, परंतु, त्यांच्यासमोर बसलेले नागरिक भरपावसात सभा ऐकत होते. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं भरपावसात भाषण गाजलं होतं. त्यानंतर, आता देवेंद्र फडणवीसांनीही पावसात भाषण सुरू ठेवल्याने या भाषणाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा >> “जवान अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत असताना…”, पंतप्रधानांच्या ‘त्या’ कृतीवर ठाकरे गटाकडून हल्लाबोल
“हे परिवर्तन फक्त मुख्यमंत्र्यांचं परिवर्तन नसून लोकांच्या जीवनात परिवर्तन आणण्यात येणार आहे. ही परिवर्तन यात्रा यशस्वी होईल आणि आपल्या राजस्थानमध्ये परिवर्तन होईल. आम्ही अजमेरमध्ये प्रवेश केला, इथं यायला आम्हाला पावणे दोन तास लागले. रस्त्यावर हजारो लोकांनी स्वागत केलं. पावसाची पर्वा न करता व्यापारी, नागरिक आमचं स्वागत करत होते. आज अजमेरच्या लोकांनी ठरवलं आहे की राजस्थानमध्ये मोदींचं सरकार बनणार. मोदी राजस्थानला पुढे घेऊन जाऊ इच्छितात. मोदींचं इंजिन सरळ पडत आहे. पण गहलोत यांचं इंजिन राजस्थानला मागे खेचत आहे. मोदींच्या इंजिनसह राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं इंजिन मागे लागलं तर राजस्थानची रेल्वे किती वेगाने पळत जाईल की राजस्थानला कोणी थांबवू शकणार नाही”, असं भाषण देवेंद्र फडणवीसांनी केलं.
“मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे शहर अजमेर येथे आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. परकीय आक्रमक मोहम्मद गौरीपासून आपला देश आणि धर्म वाचवण्यासाठी सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी सर्वस्वाचा त्याग केला, आज राजस्थानला काँग्रेसपासून मुक्त करण्यासाठी ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मागितला आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“काँग्रेसच्या कुशासनात वैभवशाली राजस्थान भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि बलात्कारात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे. राजस्थानमधील जनता गहलोत सरकारच्या जंगलराजाला कंटाळली आहे. सध्या राजस्थानच्या वातावरणात गुंजत असलेल्या मोदी-मोदी घोषणांवरून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाची लाट किंवा वादळ नसून त्सुनामी येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जगातील कोणतीही शक्ती भाजपला राजस्थानमध्ये डबल इंजिन सरकार बनवण्यापासून रोखू शकत नाही”, असं म्हणत फडणवीसांनी उपस्थित जनसमुदयात स्फुल्लिंग चेतवलं. यावेळी भाजपा राजस्थान प्रदेशाध्यक्ष सी.पी.जोशी, राजस्थानच्या सहप्रभारी विजयाताई रहाटकर, खासदार राजेंद्र गहलोत, खासदार भगीरथ चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.