दिल्ली सरकारच्या दक्षता विभागाकडून सध्या पंतप्रधान सहाय्यता निधीतून मिळालेल्या जुन्या नोटांचा तपास सुरू आहे. एका व्यक्तीने पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये २३,५०० रुपये जमा केले आहेत. मात्र ही सर्व रक्कम पाचशे आणि हजार रुपयांच्या स्वरुपात आहे. दिल्ली सरकारकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र नोटाबंदीचा निर्णय घेऊन पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करणाऱ्या पंतप्रधानांच्याच नावे असलेल्या सहाय्यता निधीत जुन्या नोटा जमा करण्याचा तपास अद्याप लागू शकलेला नाही.

दिल्ली सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दिल्लीतील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दीपक टंपी यांच्याकडे एक लिफाफा आला होता. या लिफाफ्यावर पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये दान करण्यासाठी पैसे देत असल्याचा उल्लेख होता.’ त्यानंतर दिल्ली सरकारकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. अधिष्ठाता दीपक टंपी यांनी त्यांच्याकडे आलेला लिफाफा दक्षता विभागाकडे सुपूर्द केला. यामध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या स्वरुपात एकूण २३ हजार ५०० रुपये सापडले.

दक्षता विभागाने या प्रकरणाची माहिती अर्थ मंत्रालयाला दिली. अद्याप या प्रकरणी अर्थ मंत्रालयाकडून दक्षता विभागाला कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याप्रकरणी अर्थ मंत्रालय दक्षता विभागाला माहिती देणार आहे. संबंधित व्यक्ती त्याच्याकडे असणाऱ्या जुन्या नोटा बदलू न शकल्याने त्याने या नोटा पंतप्रधान सहाय्यता निधीला दिल्या असाव्यात, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.