भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने भारतात कधी परतणार यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी भारतात कधी जायचे हे न्यायालयच ठरवेल असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.

लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरु असून हा सामना पाहण्यासाठी शुक्रवारी विजय मल्ल्या स्टेडियममध्ये पोहोचला. सामन्यानंतर ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने विजय मल्ल्याला तो भारतात कधी परतणार असा प्रश्न विचारला. यावर विजय मल्ल्या म्हणाला, मी भारतात कधी परतायचे हे न्यायालयच ठरवेल. याबाबत त्याने अधिक भाष्य करणे टाळले. मी इथे मुलाखत द्यायला आलो नाही, असे सांगून विजय मल्ल्या कारमधून निघून गेला.

किंगफिशर एअरलाइन्सचा मालक असलेल्या मल्ल्यावर विविध बँकांचे सुमारे ९ हजार कोटी रूपयांचे कर्ज बुडवून फरार झाल्याचा आरोप आहे. सध्या मल्ल्या लंडनमध्ये असून तिथे त्याच्याविरोधात भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी खटला सुरू आहे.