राज्यमंत्री विजय शिवतारे यांची टीका

मावळ गोळीबाराचे सूत्रधार अजित पवार म्हणजे जनरल डायर आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मावळात केली. १९९१ मध्ये अजित पवारांना बारामतीतून खासदार करून यापूर्वी झालेल्या चुकीची पुनरावृत्ती मावळवासियांनी करू नये, असे सांगत पवार कुटुंबाने ५० वर्षांत केवळ स्वार्थाचेच राजकारण केले, असा आरोप शिवतारे यांनी केला.

मावळ लोकसभेचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ वडगावात भेगडे लॉन्स येथे झालेल्या संयुक्त मेळाव्यात शिवतारे बोलत होते. शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखा ढोरे आदी उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, अजित पवार म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस आहे. त्यांनी महाराष्ट्राचा घात केला आहे. त्यांना निवडून देऊन यापूर्वी चूक झाली आहे. आलिशान मोटारीत फिरणारा पवारांचा मुलगा अचानक बैलगाडी चालवू लागला आहे. आजोबा म्हणतात नातवाला निवडून द्या आणि नातू म्हणतो आजोबाला पंतप्रधान करा. या पवार कुटुंबाने ५० वर्षांत केवळ स्वार्थाचेच राजकारण केले आहे. खासदार बारणे म्हणाले, मावळ मतदारसंघावर युतीचे प्राबल्य आहे. त्यामुळे निकाल काय लागेल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने मावळसाठी अत्यंत अपरिपक्व नेतृत्व समोर ठेवले आहे, अशी टीका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. पिंपरी-चिंचवडने अजित पवारांना पराभूत केले. आता मावळात पार्थचाही पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्या म्हणाल्या. पुणे जिल्हा पवारमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत आमदार बाळा भेगडे यांनी पुण्यातील चारही जागी युतीचे उमेदवार निवडून येणार, असा दावा केला.