पीटीआय, इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला असून पर्वतीय जिल्ह्यांमधील सशस्त्र कुकी बंडखोरांनी मैतेई समुदायाच्या किमान आठ निरनिराळय़ा खेडय़ांवर एकाच वेळी जोरदार हल्ले चढविले. यात किमान दोन जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील फायेंग येथे संशयित कुकी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात किमान एक जण ठार, तर अन्य एक जण जखमी झाला. दरम्यान, खेडय़ातील महिला मोठय़ा संख्येने घराबाहेर रस्त्यांवर आल्या आणि सुरक्षा दले मूक प्रेक्षकाची भूमिका बजावत असल्याचा आरोप करत त्यांनी निदर्शने केली. काकचिंग जिल्ह्यातील नापत, सेरोऊ व सुगनु येथे अतिरेक्यांनी मैतेई समुदायाची सुमारे ८० घरे जाळली.




या भागात तैनात असलेल्या राज्य पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यात एक पोलीस शहीद, तर दुसरा जखमी झाला. या घटनांमध्ये दहा नागरिक जखमी झाले. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सेकमाई येथे, बिष्णुपूर जिल्ह्यात सशस्त्र अतिरेक्यांनी मैतेई समुदायाची अनेक घरे पेटवून दिली. रविवारच्या हिंसाचारामुळे जिल्हा प्रशासनाला इम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांत संचारबंदी शिथिलतेचा कालावधी अकरा तासांवरून साडेसहा तासांवर आणणे भाग पडले.
अतिरेक्यांनी एके-४७, एम-१६ व स्नायपर रायफलींनी गोळीबार केल्याच्या घटना घडल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले. सुरक्षा दलांच्या हालचालींमध्ये अडथळे आणू नयेत, असे लोकांना आवाहन करतानाच, सरकारवर विश्वास ठेवा आणि सुरक्षा दलांना पाठिंबा द्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आतापर्यंत ४० अतिरेकी ठार
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरक्षा दलांनी सुरू केल्यानंतर, घरे जाळण्यात आणि नागरिकांवर गोळीबार करण्यात सहभागी असलेल्या सुमारे ४० सशस्त्र अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी रविवारी दिली. हा दोन समुदायांमधील संघर्ष होत नसून तो कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमधील लढा आहे, असा दावाही सिंह यांनी केला.