Goa’s Beaches Women’s safety: गोव्यातील समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती आणि इथल्या वातावरणातील धुंद जगभरातील पर्यटकांना खुणावत असते. जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक याठिकाणी येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून विदेशी पर्यटक महिलांशी गैरव्यवहार होण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर आता महिलांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रशियन नागरिक असलेल्या पोलिना गेरचिकोवा (३९) या तीन वर्षांपासून गोव्यात सोलो ट्रॅव्हलिंग करत आहेत. जेव्हा जेव्हा त्या समुद्रकिनारी जातात, तेव्हा त्यांना भारतीय पुरूष घेरतात. पुरूषांकडून त्यांना सेल्फी आणि फोटोसाठी विनंती केली जाते. पोलिना म्हणाल्या की, मी एखादी वस्तू आहे, असा मला भास होतो.

पोविना पुढे म्हणाल्या, काही जण उगाचच संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करतात आणि टक लावून पाहत बसतात. मला आठवते, एके दिवशी एक माणूस समुद्रकिनारी माझ्या शेजारी येऊन बसला. समुद्रकिनारा मोकळा होता. मी त्याला निघून जाण्यास सांगितले. पण तो माझा पाठलाग करू लागला. जेव्हा मी माझ्या फोनवर व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि कुणालातरी फोन लावण्याचे नाटक केले. तेव्हा तो चेहरा झाकून पळून गेला.

थंडीची चाहूल लागताच गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. या पार्श्वभूमीवर नुकत्याच घडलेल्या दोन घटनांनी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः एकट्याने फिरायला येणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अरंबोल समुद्रकिनाऱ्यावर दोन विदेशी महिलांबरोबर फोटो काढताना पुरुषांचा एक गट त्यांना स्पर्श करत असल्याचे आणि बळजबरीने त्यांना पकडत असल्याचे दिसून आले. एका जागरूक पर्यटकाने काढलेला हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

तसेच इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये १९ वर्षीय महिलेने पंधरा दिवसांपूर्वी गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर तिला आलेल्या भयानक अनुभवाची माहिती दिली. या तरुणीने सांगितले की, मी फिरत असताना प्रत्येकजण मला माझा रेट विचारत होता. काही जण बळजबरीने जवळीक साधत माझ्यासाठी फुकट ड्रिंक आणि जेवण देण्याचा प्रस्ताव देत होते. मला त्या पुरूषांच्या घोळक्यात खूपच असुरक्षित वाटत होते, असे वाटले की त्यांना एक ठोसा मारावा. मी माझ्या कॅब चालकाला फोन केला, तो वेळीच आला आणि मला तिथून घेऊन गेला. त्याने सुरक्षितरित्या मला माझ्या हॉटेलला सोडले.

दोन्ही घटनांची यंत्रणेने घेतली दखल

स्थानिक पोलिसांनी या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेतली आहे. अरंबोल किनाऱ्यावर घडलेल्या घटनेबद्दल अज्ञातांविरोधात बीएनएस कलम ७४ आणि कलम १२६ (२) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगितले जात आहे.

तर बागा येथील दुसऱ्या घटनेबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडिया मॉनिटरिंग टीमने सदर विदेशी पर्यटकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

गोवा सरकारच्या पर्यटन विभागाचे संचालक केदार नाईक म्हणाले, पर्यटकांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही योग्य ती कारवाई करू. विशेषतः नोव्हेंबर ते मार्च या हंगामात समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक आणि पोलिसांची गस्त वाढवली जाईल, याचा प्रयत्न करू.