गेल्या आठवड्यात विस्तारा आणि एअर इंडिया विमानाचा अपघात थोडक्यात टळला आणि मोठी दुर्घटना टळली. या दोन्ही विमानात मिळून त्यावेळी २६१ प्रवासी होते. पण, सुदैवानं महिला वैमानिक अनुपमा कोहली यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली.

हवाई वाहतूक नियंत्रण विभागाकडून (ATC) समन्वयात गोंधळ झाल्याने हा अपघात होणार होता. यावेळी एअर इंडियाचं विमान मुंबईकडून भोपाळच्या दिशेनं निघालं होतं तर विस्ताराचं विमान हे दिल्लीहून पुण्याकडे जायला निघालं होतं. विस्ताराचं विमान २९ हजार फूटांवर तर एअर इंडियाचं विमान २७,१०० फुटांवर होतं. यावेळी हवाई वाहतूक नियंत्रण विभाग आणि विस्ताराच्या  कॉकपीटमधील समन्वयात गोंधळ झाला. विस्ताराचा मुख्य पायलट त्यावेळी टॉयलेट ब्रेकवर होता. त्यामुळे विमानाची सुत्रे ही महिला सहवैमानिक अनुपमा कोहली यांच्याकडे होती.

मुंबईच्या हवाई हद्दीत काही सेकंदांसाठी दोन्ही विमानं एकमेकांच्या अगदी जवळ आली. ही दोन्ही विमानं एकमेकांसमोर होती. सहवैमानिक अनुपमा कोहली यांनी प्रसंगावधानता राखून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. अनुपमा यांनी धडक बसू नये म्हणून विमान ६०० फूट खाली आणलं. समन्वयातील गोंधळ आणि कठीण परिस्थितीवर नियंत्रण मिळवत त्यांनी २०० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले. यावेळी २० वर्षांचा दीर्घ अनुभव त्यांच्या कामी आला.