सुरुची आडारकर
आपल्याकडे धर्माइतकेच क्रिकेटला गांभीर्याने घेतले जाते म्हणजेच ‘क्रिकेट हाच एक धर्म झाला आहे आणि क्रिकेटपटू देव’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही. माझ्या भावामुळे मला क्रिकेटची गोडी लागली. लहान असताना सर्व मित्रमैत्रिणी मिळून क्रिकेट पाहायचो. आईकडून गरमागरम खाऊ मिळाला की क्रिकेटच्या मनसोक्त गप्पा व्हायच्या. योगायोगाने यंदाच्या विश्वचषकातील भारताचा पहिला सामना कुटुंबीयांसोबत पाहिला आणि भारताचा विजय दणक्यात साजरा केला. आता भारताच्या महाअंतिम सामन्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. क्रिकेटच्या गप्पांवरून लोकांना भांडताना मी पाहिले आहे. भारताचा विजय व्हावा अशी सर्वाची इच्छा आहे. पण खेळातील हार-जीत सकारात्मकतेने स्वीकारून भारतीय संघाला प्रोत्साहन द्यायला हवे. क्रिकेट हा असा खेळ आहे की तो कुठेही खेळला जातो. मग त्याला आमचा सेटही कसा अपवाद ठरेल. २०११च्या विश्वचषकातील सामने आम्ही सेटवर तसेच मेकअप रूममध्ये टीव्ही लावून पाहिले होते. आता ऑनलाइन सामन्यांचे प्रक्षेपण पाहता येणे शक्य असल्यामुळे विश्वचषकाचे सर्व सामने पाहणार आहे.
(शब्दांकन : निलेश अडसूळ)