भारत व पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांत  निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानने भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनापासूनचे सर्व वादग्रस्त विषय चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे मत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोझ्झम खान यांनी सांगितले.
सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे मुद्दे आहेत, मात्र हे मुद्दे सोडविण्यासाठी प्रस्थापित व्यवस्था असून या व्यवस्थेच्या माध्यमातूनच हा प्रश्न सोडविण्यावर पाकिस्तानचा भर असल्याचे खान यांनी सांगितले.
पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानच्या हल्ल्यांमध्ये दोन भारतीय सैनिक मारले गेल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यानंतर आपले तीन सैनिक भारताने मारल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. दोन्ही देशांतील वाढत्या तणावामुळे भारत आणि पाकिस्तानच्या सचिवांमध्ये या महिनाअखेरीस होणारी बैठक रद्द करण्यात आली. तसेच पाकिस्तानचे वाणिज्य मंत्री मखदूम अमीन फहीम यांचा आग्रा दौराही रद्द झाला.
हिंदू दहशतवादासंबंधी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विधानाचीही पाकिस्तानने नोंद घेतली आहे. या प्रकरणी भारत सरकार योग्य ती कारवाई करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
समझोता एक्सप्रेसमध्ये २००७ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी करण्यात आलेल्या तपासाची माहिती भारत सरकारने पाकिस्तानला द्यावी, अशी मागणी खान यांनी केली. त्या बॉम्बस्फोटात बहुतांश पाकिस्तानी नागरिक मारले गेले होते, त्यामुळे हा तपास अहवाल पाकिस्तानला मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
काश्मीरमध्ये बंदोबस्त
श्रीनगर : प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. बक्षी स्टेडियमवर २६ जानेवारीला संचलन होणार आहे. या संचलनाचा अभ्यास अतिरिक्त पोलीस आणि निमलष्करी दलाने गुरुवारी पूर्ण पोशाखात केला. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी विविध भागांत अडथळे निर्माण केले आहेत. तसेच या भागात येणाऱ्या वाहनांचीही कसून तपासणी करण्यात येत आहे.  तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या काही तरुणांना विविध भागांतून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.