लंडन : गाझामधील युद्ध आता संपले पाहिजे आणि इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केले पाहिजे, असे सांगत ब्रिटन, फ्रान्स आणि अनेक युरोपीय राष्ट्रांसह २५ देशांनी सोमवारी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले.
‘‘गाझामधील नागरिकांचे दु:ख उच्च पातळीवर पोहोचले आहे. अन्न-पाणी आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहान मुलांसह नागरिकांची अमानुष हत्या करण्यात येत आहे. इस्रायली सरकारचे मदत वितरण प्रारूप धोकादायक आहे. ते अस्थिरतेला चालना देते आणि गाझावासीयंना मानवी प्रतिष्ठेपासून वंचित ठेवते,’’ असे या निवेदनात म्हटले आहे.
नागरी लोकसंख्येला आवश्यक मानवतावादी मदत नाकारण्याची इस्रायली सरकारची भूमिका अस्वीकार्य आहे. इस्रायलने आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांतर्गत आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन केले पाहिजे, असेही त्यात म्हटले आहे.
स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये २० युरोपीय देशांचे परराष्ट्र मंत्री तसेच कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. अमेरिका आणि जर्मनीने निवेदनावर स्वाक्षरी केली नाही. युरोपीय महासंघाच्या आयुक्तांनीही त्यावर स्वाक्षरी केली आहे.
पॅलेस्टिनी मृतांचा आकडा ५९ हजारांवर
गाझा पट्टीत इस्रायल-हमासमध्ये २१ महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या युद्धानंतर पॅलेस्टिनी मृतांचा आकडा ५९,००० च्या वर गेल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५९,०२९ लोक मारले गेले आहेत, तर १,४२,१३५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निम्म्याहून अधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे.