पीटीआय, ओमाहा (अमेरिका)
जागतिक कीर्तीचे गुंतवणूकतज्ज्ञ वॉरन बफे यांनी ‘बर्कशायर हॅथवे’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वर्षअखेर निवृत्त होण्याची घोषणा करत कंपनीच्या सुमारे आडीच लाख गुंतवणूकदारांना धक्का दिला. कंपनीचे विद्यामान उपाध्यक्ष ग्रेग अबेल आपली जागा घेतील, असेही त्यांनी भरगच्च बैठकीमध्ये जाहीर केले.
गेली सहा दशके भांडवली बाजार आणि बफे हे नाव जोडले गेले आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी येथे झालेल्या गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात आपल्या निवृत्तीची घोषणा केली. सभेच्या अखेरीस बफे यांच्याबरोबर नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तराचे सत्र होते. या पाच तासांच्या सत्रात अखेरीस त्यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले. ‘‘या वर्षाच्या अखेरीस ग्रेस मुख्य कार्यकारी अधिकारी होतील… ती वेळ आता आली आहे,’’ असे मात्र ९४ वर्षीय बफे म्हणाले. निवृत्त झाल्यानंतरही आपली गुंतवणूक बर्कशायरमध्येच कायम ठेवण्याची घोषणा करत बफे यांनी अबेल यांच्यावर विश्वास दाखविला. ६२ वर्षांचे अबेल हे त्यांचे नैसर्गिक वारसदार मानले जात असले, तरी बफे तहहयात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहतील, असे मानले जात होते.
बाजार हादरविण्याची क्षमता
भांडवली बाजारांतील बारकावे अचूक टिपून गुंतवणूक हे बफे यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांच्या गुंतवणुकीचे आकडे जाहीर झाल्यानंतर अनेक जण त्याला अनुसरून लाखो गुंतवणूकदार समभागांची खरेदी-विक्री करतात. जगभरातील भांडवली बाजारांमधील आकडे फिरविण्याची क्षमता असलेले गुंतवणूक तज्ज्ञ म्हणून बफे यांची ख्याती आहे.