Ahmedabad Air India Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये तब्बल २७५ जणांचा बळी गेला. या घटनेत विमानातील पायलट आणि क्रू सदस्यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? याची कारणं आता शोधण्यात येत आहेत. यासाठी तपास यंत्रणा तपास करत असून अपघाताची कारणं शोधण्यात येणार आहेत.
या घटनेनंतर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. यातच योगगुरू रामदेव बाबा यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. मात्र, या विमान दुर्घटनेबाबत बोलताना रामदेव बाबा यांनी वेगळाच संशय व्यक्त केला होता. या दुर्घटनेमागे परकीय शक्ती असू शकतात असं म्हणत त्यांनी तुर्कीयेकडे बोट दाखवलं होतं. दरम्यान, यानंतर आता तुर्कीयेची प्रतिक्रिया समोर आली असून तुर्कीयेने हा दावा फेटाळून लावला आहे.
एका निवेदनात कम्युनिकेशन्स डायरेक्टरेटच्या सेंटर फॉर काउंटरिंग डिसइन्फॉर्मेशनने स्पष्ट केलं की, तुर्कीये टेक्निकने विमानाच्या देखभाल दुरुस्ती केल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. तुर्कीये म्हटलं की, “२०२४ आणि २०२५ मध्ये एअर इंडिया आणि टर्किश टेक्निक यांच्यात झालेल्या करारांतर्गत केवळ बी७७७ प्रकारच्या वाइड-बॉडी विमानांसाठी देखभाल सेवा पुरविल्या जातात. अपघातात सहभागी असलेले बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या कराराच्या कक्षेत येत नाही. आजपर्यंत टर्किश टेक्निकने या प्रकारच्या कोणत्याही एअर इंडिया विमानाची देखभाल केलेली नाही”, असं तुर्कीयेने म्हटलं आहे.
“तसेच अपघातग्रस्त विमानाची देखभाल कोणत्या कंपनीने केली हे आम्हाला माहिती असले तरी पुढील अनुमान टाळण्यासाठी या विषयावर विधान करणे योग्य नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कीयेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या प्रमुख ब्रँडच्या प्रतिष्ठेला लक्ष्य करणाऱ्या प्रयत्नांवर लक्ष ठेवणे आणि आवश्यक उपाययोजना करणे सेंटर फॉर काउंटरिंग डिसइन्फॉर्मेशन सुरू ठेवेल”, असंही म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
रामदेव बाबा काय म्हणाले होते?
“या दुर्घटनेमागे तुर्कीये असू शकतो असं मला वाटतंय. तुर्कीयेची एक कंपनी या विमानांच्या देखभाल दुरुस्तीचं (मेन्टेनन्स व सर्व्हिसेस) काम करत होती. मात्र आता हवाई वाहतूक कंपन्यांना याकडे लक्ष द्यावं लागेल. तुर्कीयेने सूड तर उगवला नसेल ना, त्यांनी कुठला कट तर रचला नसेल ना? असा प्रश्न पडला आहे. कारण त्या कंपनीचं कंत्राट अलीकडेच रद्द केलं होतं. त्यामुळे अशा संवेदनशील कामांमध्ये परदेशी कंपन्यांचा हस्तक्षेप बंद झाला पाहिजे असं मला वाटतं”, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं होतं.