काश्मीरमध्ये एका स्थानिक व्यक्तीला महिन्याभरापूर्वी लष्कराच्या जीपच्या समोर बांधून फिरवण्यात आले होते. काश्मिरी व्यक्तीला जीपसमोर बांधून फिरवणाऱ्या मेजर गोगोई यांना सोमवारी लष्कराकडून सन्मानित करण्यात आले. यावर जीपसमोर बांधण्यात आलेल्या व्यक्तीने प्रश्न उपस्थित केला आहे. ‘माझ्यासोबत अशी वर्तणूक करायला मी काय जनावर होतो का ?’ असा प्रश्न जीपसमोर बांधण्यात आलेल्या व्यक्तीने विचारला आहे.
महिन्याभरापूर्वी फारुख डार यांना काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात निवडणुकीच्या दिवशी जीपसमोर बांधून फिरवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. लष्करी गाड्यांवर दगडफेक करण्यात असल्याने मेजर गोगोई यांनी डार यांना जीपसमोर बांधले होते. या कृतीसाठी मेजर गोगोई यांचा सन्मान करण्यात आल्यावर डार यांनी त्यांच्यी उद्विग्नता व्यक्त केली आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
‘मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. गाडीच्या समोर बांधून फिरवायला मी जनावर आहे का? अशा प्रकारची वर्तणूक द्यायला मी म्हैस किंवा बैल होतो का ?’ असे प्रश्न फारुख डार यांनी विचारले आहेत. मेजर गोगोई यांचा सन्मान करण्यात आल्याबद्दल डार यांनी नाराजी व्यक्त केली. ‘भारतात जर हाच कायदा असेल, तर मग मी काय बोलू ?’, अशा शब्दांमध्ये डार यांनी स्वत:ची हतबलता व्यक्त केली आहे. ‘मी काही मेजर गोगोई यांचा सन्मान करणाऱ्या अधिकाऱ्यांशी वाद घालायला जाणार नाही,’ असेदेखील डार यांनी म्हटले.
मेजर गोगोई यांचा सन्मान केल्याबद्दल जम्मू काश्मीरमधील विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने जोरदार टीका केली आहे. ‘तुम्ही न्यायालयाच्या निकालाीदेखील वाट पाहिली नाही. ‘मानवी ढाल’ करण्याची कृती करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान ही विचित्र बाब आहे. सभ्य समाजात हे शक्य आहे का ?,’ अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते जुनैद मट्टू यांनी केली आहे. मात्र गोगोई यांचा सन्मान बडगाममधील कारवाईसाठी करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिली आहे.