आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारे उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य आणि माजी अध्यक्ष वसीम रिझवी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. वसीम रिझवी यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं आहे. यामध्ये त्यांनी आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्याला दफनभूमीमध्ये दफन न करता श्मशानामध्ये अग्नी देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करावेत असं म्हटलं आहे. रिझवी यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये पार्थिवाला अग्नी देण्याचे अधिकार डासना मंदिराचे महंत नरसिम्हा नंद सरस्वती यांना देत असल्याचं म्हटलं आहे. रिझवी यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओही जारी केलाय.

रिझवी यांनी रविवारी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये केलेल्या दाव्यानुसार त्यांची हत्या करण्याचा किंवा शिरच्छेद करण्याचा कट रचला जातोय. तसेच माझी हत्या करणाऱ्याला पुरस्कार देण्याचीही वक्तव्य केली जात असल्याचा दावा रिझवी यांनी केलाय. रिझवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मी कुराणमधील २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. माझा गुन्हा हा आहे की मी पैगंबर ए-एस्लाम हजरत मोहम्मद यांच्यावर एक पुस्तक लिहिलं. त्यामुळेच कट्टरपंथी मला मारण्याचा कट रचत आहेत,” असं रिझवी म्हणालेत. माझ्या पार्थिवाला दफनभूमीमध्ये जागा दिली जाणार नाही असंही या कट्टरपंथींकडून सांगितलं जात असल्याचं रिझवी म्हणालेत. त्यामुळेच माझ्या मृत्यूनंतर देशामध्ये शांतता कायम रहावी म्हणून मी मृत्यूपत्र लिहून प्रशासनाला पाठवत आहे. माझ्या मरणानंतर माझ्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले जावेत, अशी मागणी मी मृत्यूपत्रात केलीय, असंही रिझवी म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या मृत्यूनंतर शांतता कायम रहावी म्हणून मी मृत्यूपत्र लिहिलं आहे. मृत्यूनंतर माझं पार्थिव लखनऊमधील माझ्या हिंदू मित्रांच्या स्वाधीन करावं आणि त्यानंतर चिता रचून त्यावर अंत्यसंस्कार करावेत. माझ्या चितेला अगदी नरसिम्हा नंद सरस्वती यांनी द्यावा,” असं रिझवी म्हणालेत. रिझवी यांचं वादग्रस्त पुस्तक समोर आल्यापासून मुस्लीम समाजाकडून त्यांचा जोरदार विरोध केला जात आहे.