गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचा झंझावाती प्रचार करणाऱ्या राहुल गांधी यांनी शुक्रवारी आपल्या एका कृतीने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले. राहुल गांधी आज तारापूर येथे प्रचारासाठी आले होते. यावेळी राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांसह एका पावभाजीच्या गाडीवर गेले. त्यांनी याठिकाणी एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे पावभाजी तयार होईपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर जवळच्याच एका बाकड्यावर बसून राहुल यांनी पावभाजी खाल्ली. यावेळी राहुल यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. लोक राहुल यांचे फोटो काढत होते. अनेकांना पावभाजी खाताना राहुल यांच्यासोबत सेल्फीही काढले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

जनतेशी संवाद साधण्यासाठी राहुल यापूर्वीही सामान्य लोकांच्या घरात जाऊन राहिले होते, त्यांच्या घरी भोजन केले होते. त्यावेळीही या सगळ्याची प्रचंड चर्चा रंगली होती. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांचा गुजरातमधील झंझावाती प्रचार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. या प्रचारादरम्यान राहुल यांच्या देहबोलीत आणि वक्तृत्व शैलीत नेहमीपेक्षा अधिक आत्मविश्वास जाणवत आहे. साहजिकच त्यांच्यातील हा बदल अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. त्यामुळे राहुल यांची लोकप्रियताही वाढताना दिसत आहे. मध्यंतरी गुजरातमध्ये राहुल गांधी मिनी बसमधून रोड शो करत होते. त्यावेळी क तरूणी राहुल गांधी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी थेट बसच्या टपावर चढली. यावेळी तिने राहुल यांना पुष्पगुच्छही दिला आणि त्यानंतर राहुल यांच्यासोबत सेल्फी काढून घेतला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली होती. या गर्दीतून वाट काढत ही तरूणी बसच्य़ा टपावर जाऊन चढली. सेल्फी काढल्यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या अंगरक्षकांनी तरूणीला टपावरून खाली उतरायला मदतही केली.