नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठासंदर्भात (जेएनयू) लोकांची धारणा बदलण्याची गरज आहे. ‘जेएनयू’ म्हणजे तुकडे तुकडे टोळी नव्हे. मी कुलगुरू झाल्यापासून इथे कोणी अशी भाषा करत असलेले पाहिलेले नाही. ‘जेएनयू’मध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादी आहोत, अशी भूमिका ‘जेएनयू’च्या कुलगुरू शांतीश्री धुलिपुडी पंडित यांनी मांडली.

रामनवमीनिमित्त हवन आणि मांसाहाराच्या सेवनावरून ‘जेएनयू’मध्ये रविवारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाल्यानंतर पुन्हा ‘जेएनयू’वर ‘तुकडे तुकडे टोळी’चा आरोप होऊ लागला आहे. विद्यापीठामध्ये विविध प्रकारच्या विचारसरणीचा प्रभाव असलेले विद्यार्थी शिकतात, त्यांची विविध स्वरूपाची मते असतात. विद्यार्थ्यांमध्ये मतमतांतरे असू शकतात. विद्यापीठासारख्या व्यापक शैक्षणिक संस्थांमध्ये विचारांचे वैविध्य असते व त्याचा सन्मानही केला जातो, असा युक्तिवाद कुलगुरू पंडित यांनी केला.

‘जेएनयू’मध्ये विचारांचे आदानप्रदान केले जाते, त्यामुळे विद्यापीठात खुले वातावरण आहे. कोणीही आपली मते मांडू शकतो, पण त्यातून िहसा होणे योग्य नाही आणि हिंसक घटना खपवून घेतल्या जाणार

नाहीत, असेही पंडित यांनी स्पष्ट केले. रामनवमी हवन व खानावळीतील मांसाहार या दोन मुद्दय़ांवरून झालेल्या हिंसक संघर्षांसंदर्भात वेगवेगळे दावे केले गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची विद्यापीठ सखोल आणि निष्पक्ष चौकशी करत आहे. चौकशी अहवाल अजून  हाती आलेला नाही, अशी माहिती पंडित यांनी दिली.

प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जेएनयू’च्या कावेरी हॉस्टेलमधील खानावळीत मांसाहारी पदार्थ शिजवण्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती आणि त्यामध्ये १६ विद्यार्थी जखमी झाले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) अज्ञात सदस्यांविरोधात गुन्हा नोंदवला असला तरी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. रविवारी रामनवमीनिमित्त होमहवनाला कावेरी हॉस्टेलमध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांशी निगडित विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केल्याचा दावा ‘अभाविप’ने केला आहे, तर कावेरी हॉस्टेलच्या खानावळीत चिकन शिजवण्याला ‘अभाविप’च्या सदस्यांनी विरोध केला आणि विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप ‘जेएनयूएसयू’च्या सदस्यांनी केला आहे.