बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (शनिवार, १२ जानेवारी २०२२ रोजी) पुण्यात निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहचा आधारस्तंभ हरपला आहे. आपल्या परखड आणि स्पष्ट मतांसाठी राहुल बजाज हे उद्योग क्षेत्राबरोबरच समाजिक क्षेत्रामधील प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी ओळखले जायचे. असाच एक प्रसंग काही वर्षांपूर्वी घडला होता जेव्हा राहुल बजाज यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री असणाऱ्या अमित शाह यांना एका चर्चा सत्रामध्ये थेट प्रश्न विचारला होता.

नक्की काय घडलं होतं?
झालं असं की, २०१९ साली नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इकनॉमिक टाइम्सच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये देशातील आघाडीचे उद्योजकांसोबत केंद्रीय गृहमंत्र्यासोबत चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं. येथील काही निवडक उद्योजकांनी अमित शाह यांना उद्योग जगताबरोबरच देशातील समस्यांसंदर्भात प्रश्न विचारले. याच मोजक्या उद्योजकांमध्ये राहुल बजाज यांचाही समावेश होता. देशात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही? असा थेट प्रश्न माईक हातात येताच राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना विचारला. त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, तसेच तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे
“सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना का नाही? लोकांना युपीएच्या सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र, सध्याच्या सरकारने भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. युपीए-२ च्या कार्यकाळात आम्ही कोणावरही टीका करु शकत होतो,” असं राहुल बजाज यांनी अमित शाहांना समोरासमोर प्रश्न विचारताना म्हटलं होतं.

नक्की वाचा >> Rahul Bajaj Death: करोना काळात ग्रामीण भारतासाठी बजाज यांनी केलेली १०० कोटींची मदत; मदतीवर पवार म्हणाले होते…

अमित शाहांनी दिलेलं उत्तर…
अमित शाह यांनीही राहुल बजाज यांच्या या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. “देशात कुठल्याही प्रकारच्या भीतीचे वातावरण नाही. कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. मोदी सरकारवर माध्यमांमधून कायमच टीका होत राहिली आहे,” असं शाह म्हणाले होते. तसेच पुढे बोलताना, “तरीही तुम्ही म्हणत असाल की देशात असे वातावरण आहे तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला काम करावे लागेल. सरकार पारदर्शी पद्धतीने काम करीत आहे. कोणती टीका होत असेल तर त्याला गांभीर्याने घेत आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करीत असतो,” असंही शाह म्हणाले होते.

करोना काळात १०० कोटींची मदत…
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. जवळजवळ पाच दशकं त्यांनी कंपनीचं नेतृत्व केलं. या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि ते योग्य असल्याचं सिद्ध करुन दाखवलं. भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातील एक आघाडीचं नाव म्हणून राहुल बजाज यांचं नाव घेतलं जातं. २००१ मध्ये त्यांना उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. राहुल बजाज हे केवळ उद्योजक नव्हते तर ते समाजकार्यासाठीही अनेकदा मदत करायचे. २०२० साली त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बजाज समुहाच्यावतीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. विशेष म्हणजे देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच बजाज यांनी सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत ही घोषणा केली होती.