Independence Day 2025 Celebration स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. ते म्हणाले की, ‘या दिवाळीत सरकार जीएसटी सुधारणा आणत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना करांमध्ये मोठा दिलासा मिळेल. ते म्हणाले की, आजपासून पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या मुलाला किंवा मुलीला सरकारकडून १५ हजार रुपये दिले जातील. यासाठी १ लाख कोटींहून अधिक तरतूद करण्यात आल्याचंही मोदींनी सांगितलं. आपल्या भाषणात मोदींनी संघाबाबत गौरवोद्गार काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं १२ व्यांदा केलं ध्वजारोहण
देशाची राजधानी दिल्लीत ध्वजारोहण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आज १२ व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं. मोदी म्हणाले, स्वातंत्र्याचं हे पर्व १४० कोटी लोकांच्या गौरवाचं पर्व आहे. प्रत्येक मनात आशा आणि अपेक्षा आहेत. देश एकतेच्या भावनेला निरंतर बळकट करतो आहे. १४० कोटी देशवासी आज तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत. आज देशात मातृभूमीचं जयगान गायलं जातं आहे. १९४७ मध्ये अनेक शक्यतांसह, कोटी कोटी भुजांच्या सामर्थ्याने आपला देश स्वतंत्र झाला. देशाच्या आशा अपेक्षा उड्डाण घेत होत्या, मात्र आव्हानं प्रचंड प्रमाणात होती. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
संघाबाबत मोदींचे गौरवोद्गार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मोदी म्हणाले, “१०० वर्षांपूर्वी एक संघटना जन्माला आली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांनी स्वतःला मातृभूमीसाठी समर्पित केले आहे. ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. सेवा, समर्पण, संघटना आणि अतुलनीय शिस्तीद्वारे, आरएसएसने राष्ट्र उभारणीत एक अद्वितीय भूमिका बजावली आहे. ती जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एक मानली जाते. लाल किल्ल्यावरुन मी सर्व स्वयंसेवकांना आणि त्यांच्या कार्याला सलाम करतो.” यानंतर पंतप्रधान म्हणाले की, आपल्याला आपल्या सर्व भाषांचा अभिमान असला पाहिजे. हस्तलिखिते ज्ञानाचे भांडार आहेत. ज्ञान भारत योजनेअंतर्गत, जिथे जिथे हस्तलिखिते आहेत तिथे आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे जतन करण्याचे काम करत आहोत, जेणेकरून त्या लोकांसाठी उपयुक्त ठरतील. देश कोट्यवधी लोक, ऋषी, शेतकरी, कामगार, सैन्याच्या प्रयत्नांनी बनला आहे.
न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही-मोदी
ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यांनी शौर्य आणि पराक्रम दाखवला त्या सगळ्या वीरांचं कौतुक कऱण्याची संधी मला मिळाली आहे. शत्रूला त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक शासन करण्याचं काम आपल्या जवानांनी आणि सैन्य दलांनी केलं. धर्म विचारुन पहलगाममध्ये लोकांना मारलं गेलं. पत्नीसमोर पतीला मारलं, मुलांसमोर त्यांच्या वडिलांना ठार केलं. संपूर्ण हिंदुस्थानात या घटनेने आक्रोश होता. या प्रकाराच्या हल्ल्यामुळे जग हादरुन गेलं होतं. पण ऑपरेशन सिंदूर या आक्रोशाचं उत्तर होतं. २२ एप्रिलनंतर आपण आपल्या सैन्य दलांना कारवाईसाठी पूर्ण सूट दिली होती. रणनीती त्यांनी ठरवावी, वेळ त्यांनी ठरवावी, लक्ष्य त्यांनी ठरवावं आणि आपल्या सैन्य दलांनी अशी कामगिरी केली जी अनेक वर्षांत झाली नाही. आपल्या सैन्य दलांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानची झोप अजूनही उडाली आहे. पाकिस्तानात झालेला विध्वंस इतका मोठा आहे की रोज नवे खुलासे होत आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आता न्यूक्लिअर ब्लॅकमेल कधीही सहन करणार नाही. दहशतवाद माजवणारे आणि दहशतवादाला खतपाणी घालणारे सगळ्यांना एकच मानलं जाईल. तसंच सैन्य दलांना त्यांच्या विरोधात कारवाईची खुली सूट असेल. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग आजवर खूप सहन केलं आता अजिबात सहन करणार नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पाकिस्तानला पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरील भाषणातून ठणकावलं.