देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असताना सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, तरीही सरकारकडून यावर तोडगा काढण्यात येत नसल्याची ओरड होत असताना भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी नव्या फॉर्म्युल्यावर विचार सुरु असल्याचे शाह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.


अमित शाह म्हणाले, इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. यासंदर्भात पेट्रोलिअम मंत्री उद्या तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. इंधनाच्या किंमती कमी व्हाव्यात यासाठी आम्ही नव्या फॉर्म्युल्यावर काम करीत आहोत.

कर्नाटकमधील निवडणुकीनंतर सुरु असलेली इंधन दरवाढ मंगळवारीही कायम आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला असून पेट्रोलने लिटरमागे ८४. ७३ रुपयांचा आकडा गाठला. तर डिझलेने लिटरमागे ७२. ५३ रुपयांचा आकडा गाठला आहे. पेट्रोल व डिझेल महागल्याने महागाई देखील वाढणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरुन विरोधकही आक्रमक झाले असून सोशल मीडियावरही मोदी सरकारवर टीका सुरु आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीमुळे केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने काही काळ रोखून धरलेली इंधन दरवाढ निकालानंतर लागू केल्यामुळे देशभरात पेट्रोल- डिझेलच्या दराने उच्चांक गाठला. इंधन दरवाढीमुळे वस्तू आणि शेतमालाची भाववाढ अटळ आहे.