भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, कृषी कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला २ ऑक्टोबर पर्यंतचा वेळ दिला आहे. यानंतर आम्ही पुढील नियोजन करणार आहोत. तसेच, आम्ही दबावात सरकार सोबत चर्चा करणार नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द केल्यानंतरच आम्ही घरी परत जाणार आहोत, असंही टिकैत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारने कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपीवर कायदा बनवावा, नाहीतर आंदोलन सुरूच राहील. आम्ही संपूर्ण देशभरात यात्रा काढू आणि संपूर्ण देशात आंदोलन होईल. असं देखील राकेश टिकैत म्हणाले आहेत.

आज देशभरात शेतकरी संघटनांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना महामार्गावर ठिय्या मांडत आंदोलन केलं. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत हे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या टिकैत यांनी त्यांचा मार्ग रोखणाऱ्या पोलिसांसमोर हात जोडले आणि जय जवान, जय किसानच्या घोषणा दिल्या. तसेच आपण सर्वजण भाऊ-भाऊ आहोत असंही ते पोलिसांना म्हणाले.

“शेतकरी आणि जवान देशाचा कणा आहेत. शेतकरी आपल्या अधिकारांसाठी आंदोलन करत आहेत, तर पोलीस आपलं कर्तव्य निभावत आहेत. त्याचं कोणाशीही शत्रूत्व नाही, हे जवान तर आपले भाऊ आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आपण शतशः नमन करतो. शेतकऱ्यांच्या मागण्या तर भाजपा सरकारकडे आहेत. ज्यांनी तीन काळे कायदे आणून भाकरी तिजोरीत बंद करण्याचा प्रयत्न केला आहे” तर, आपले हक्क मिळवल्याशिवाय शेतकरी दिल्लीच्या सीमेवरुन कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी परतणार नाहीत, असंही टिकैत यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We have given time to the government till 2nd october to repeal the laws rakesh tikait msr
First published on: 06-02-2021 at 17:23 IST