राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जमीन अधिग्रहण विधेयक पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पराभव करू. आम्ही एक इंचही जमीन कुणाला देणार नाही, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ५६ इंची छाती लोकच ५.६ इंच करून टाकतील अशी कडवट टीका
केली. राजस्थानातील वसुंधरा राजे शिंदे सरकार म्हणजे ललित मोदी सरकार आहे असेही ते राजे व ललित मोदी यांच्या संदर्भातील प्रकरणावर म्हणाले.
जमीन अधिग्रहण विधेयक वादग्रस्त असून ते पुढील आठवडय़ात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा मांडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, त्यावर काँग्रेसची रणनीती राहुल गांधी यांनी स्पष्ट केली.
पक्ष कार्यकर्त्यांपुढे त्यांनी सांगितले, की आम्ही जमीन अधिग्रहण विधेयक संसदेत मंजूर होऊच देणार नाही. मोदी सरकारने त्यावर तीनदा वटहुकू म जारी केला आहे. हे सरकार उलट विरोधकांना मदत करीत आहे. वेळ येईल तशी ते मदतच करीत आहेत. शेतकऱ्यांशी संबंधित जमीन अधिग्रहणाच्या विधेयकावर त्यांनी तीनदा वटहुकूम काढला असला तरी आम्ही ते विधेयक संमत होऊ देणार नाही व एक इंचही जमीन देणार नाही. मोदींची प्रचाराच्या वेळी असलेली ५६ इंचाची छाती देशातील शेतमजूर, शेतकरी, जनता व काँग्रेस पक्ष ५.६ इंचाची करून टाकेल.
राहुल गांधी यांनी वसुंधरा राजे सरकारची तुलना ब्रिटिश सरकारशी केली त्या वेळी दूरनियंत्रक म्हणजे रिमोट लंडनमध्ये होता. आता आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदीही लंडनमध्ये असून राजे सरकारशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. राजस्थान सरकारचा रिमोट लंडनमध्ये आहे. ललित मोदी तिकडे बटन दाबतात व वसुंधरा राजे उडय़ा मारतात. काळा पैसा जमवणाऱ्या ललित मोदीसारख्या भगोडय़ाला वसुंधरा राजे यांनी मदत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचा पलटवार, राहुल हे ‘डायपरमधले लहान मूल’
नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली बोचरी टीका भाजपला चांगलीच झोंबली असून राहुल हे ‘डायपरमधले लहान मूल’ असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल यांनी राजस्थानच्या वसुंधरा राजे यांच्या सरकारचा रिमोट लंडनमध्ये असून ललित मोदींच्या इशाऱ्यावर राजे नाचत असल्याची टीका केली. यावर भाजपने काँग्रेसच्या राज्यांत रिमोट कंट्रोलवर राज्यकारभार चालतो. ही त्यांची कार्यपद्धती आहे, भाजपची नाही, असा आरोप भाजपचे सचिव सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We oppose land acquisition rahul gandhi
First published on: 18-07-2015 at 01:41 IST