जनतेने मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन करतानाच जर आपण मतदान केले नाही आणि फक्त समस्यांचा पाढाच वाचत राहिलो तर आपणच मूर्ख ठरु, असे मत ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केले. मी निष्ठावान आणि प्रामाणिक माणसाला मतदान केले, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात देशभरातील ७१ जागांवर मतदान होत आहे. यात राज्यातील १७ जागांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी अभिनेते परेश रावल आणि त्यांची पत्नी स्वरुप संपत यांनी विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर परेश रावल यांनी मतदारांना प्रतिक्रिया दिली. परेश रावल म्हणाले, जनतेने मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन करतानाच जर आपण मतदान केले नाही आणि फक्त समस्यांचा पाढाच वाचत राहिलो तर आपणच मूर्ख ठरु. मी निष्ठावान आणि प्रामाणिक माणसाला मतदान केले, असे त्यांनी सांगितले.

परेश रावल यांनी २०१४ मध्ये भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. ते खासदार म्हणून निवडून देखील आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत परेश रावल यांनी निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका घेतली. यावरुन विरोधकांनी परेश रावल यांच्यावर प्रश्नांचा भडीमारही केला होता. मात्र, यासंदर्भात सोमवारी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता परेश रावल यांनी उत्तर देण्यास नकार दिला.