नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ फाईल्समधील दस्तावेज पश्चिम बंगाल सरकारने शुक्रवारी सामान्यांसाठी खुला केल्या. आतापर्यंत गोपनीय असलेल्या फाईल्स खुल्या करण्यात आल्यामुळे नेताजींचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दलही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. पश्चिम बंगाल सरकारने काही दिवसांपूर्वीच या फाईल्स सामान्यांसाठी खुल्या केल्या जातील, असे स्पष्ट केले होते.
एकूण ८ डीव्हीडींच्या माध्यमातून १२ हजार पाने खुली करण्यात आली आहेत. या कार्यक्रमाला बोस यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. या फाईल्समधील मजकूर कोलकाता पोलीस संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. या डीव्हीडी पोलीसांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, नेताजींचे जुने दस्तावेज खुले करून पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने आम्ही पाऊल टाकले आहे. ती आमची जबाबदारीच आहे. या फाईल्समध्ये देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचेल, असे काहीही नाही. नेताजी हे एक राष्ट्रपुरुष होते. त्यांच्यासोबत काय घडले, याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. त्यांची जन्मतारीख काय होती, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र, त्यांचा मृत्यू कसा झाला, याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. आणि ते जाणून घेणे हा लोकांचा अधिकारच आहे.