जलपायगुरी जिल्ह्य़ात एका मुलीचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीने तिला गोळ्या झाडून ठार केले. या घटनेनंतर काही तासातच पाठलाग करणाऱ्याला त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोर मोटर बाईकवर या मुलीचा पाठलाग करीत होते. अकरावीत शिकणारी ही विद्यार्थिनी खासगी शिकवणी वर्ग आटोपून घराकडे जात असताना हा प्रकार घडला. फलकाटा येथील सुभाष कॉलनी परिसरात तिच्या घराबाहेरच तिच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. तिच्या डोक्याला गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी निदर्शने केली व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
मुलीचे वडील कनू दत्ता यांनी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला, आपल्या मुलीवर तपन दास ऊर्फ खुडू याने गोळ्या झाडल्या व तो तिच्या मागावर होता असे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी पहिल्यांदा दोनजणांना फलकाटा येथे अटक केली त्यात गोपाल आचार्य व बिजित दत्ता यांचा समावेश आहे ते तपस दास याचे साथीदार होते. पहिल्या दोघांचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी तपस याला सिलिगुरी येथे अटक केली. तपस हा अगोदरही गुन्हेगारी कारवायात गुंतलेला असून त्याच्यावर खून व खंडणीचे गुन्हे आहेत.